डोडा(doda)१६ जुलै:- जम्मू-काश्मीरच्या डोडा जिल्ह्यात सोमवारी रात्रीपासून सुरू असलेल्या दहशतवादी आणि सुरक्षा दलांमधील चकमकीत एका लष्करी अधिकाऱ्यासह चार जवान शहीद झाले आहेत. लष्कर, सीआरपीएफ आणि पोलिसांचे संयुक्त पथक हे ऑपरेशन करत आहे. सुरक्षा दलांनी काही दहशतवाद्यांना घेरले असून, अंधाराचा आणि घनदाट जंगलाचा फायदा घेऊन त्यांचा पळून जाण्याचा प्रयत्न अपयशी ठरवला आहे.
यासंदर्भात माहिती देताना अधिकाऱ्यांनी सांगितले की, राष्ट्रीय रायफल्स आणि जम्मू-काश्मीर पोलिसांच्या विशेष ऑपरेशन ग्रुपच्या जवानांनी संध्याकाळी सुमारे ७.४५ वाजता देसा वनक्षेत्रातील धारी गोटे उरारबागी येथे संयुक्त घेराबंदी आणि शोध मोहीम सुरू केली, त्यानंतर चकमक सुरू झाली. थोड्या वेळाच्या गोळीबारानंतर दहशतवाद्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. एका अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखालील सैनिकांनी आव्हानात्मक प्रदेशात घनदाट जंगलातून त्या दहशतवाद्यांचा पाठलाग केला. रात्री ९ च्या सुमारास जंगलात आणखी एक चकमक झाली, ज्यात पाच जवान गंभीर जखमी झाले.
त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान एका अधिकाऱ्यासह चौघांचा मृत्यू झाला.जम्मू विभागाला दहशतवादी सातत्याने लक्ष्य करत आहेत. डोडा जंगलात दहशतवाद्यांचा एक गट लपल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती. यावर जम्मू-काश्मीर पोलिसांच्या विशेष पथकाने आणि लष्कराच्या जवानांनी परिसरात शोध मोहीम राबवली. हे ऑपरेशन “ऑपरेशन कोठी” नावाने ओळखले जाते. चकमकीनंतर या भागात अतिरिक्त तुकड्या पाठवण्यात आल्या असून कारवाई सुरूच आहे.अलीकडच्या काळात जम्मू भागात विशेषत: पूंछ, दोडा, राजौरी आणि रियासी सारख्या सीमावर्ती जिल्ह्यांमध्ये दहशतवादी कारवाया वाढल्या आहेत. या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा यंत्रणा हाय अलर्टवर आहेत. जम्मू विभागात सध्या ५० दहशतवादी सक्रिय असून, यातील बहुतांश परदेशी म्हणजेच पाकिस्तानी आहेत.
त्यांचा नायनाट करण्यासाठी लष्कर, सीआरपीएफ आणि जम्मू-काश्मीर (Jammu and Kashmir) पोलिसांची संयुक्त पथके मोठ्या प्रमाणावर शोध मोहीम राबवत आहेत.रविवारी, लष्कराने जम्मू-काश्मीरच्या रियासी जिल्ह्यात दहशतवादी लपून बसलेल्या ठिकाणाहून शस्त्रे आणि दारूगोळा जप्त केला होता. जप्त करण्यात आलेल्या वस्तूंमध्ये एके-४७ रायफलचे ३० राउंड, एक मॅगझिन आणि एक एचई-३६ हँडग्रेनेडचा समावेश होता.