ज्या कुटुंबांचं आर्थिक उत्पन्न हे अडीच लाखांपेक्षा कमी आहे, अशा कुटुंबातील महिलांसाठी सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण ही योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत महिलांच्या खात्यात दर महिन्याला दीड हजार रुपये जमा करण्यात येतात. मात्र जर आमची सत्ता पुन्हा आली तर आम्ही 2100 रुपये देऊ अशी घोषणा विधानसभा निवडणुकीच्या वेळी महायुतीकडून करण्यात आली होती, मात्र अजूनही याबाबत कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही, यावरून विरोधकांकडून सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न होत आहे, यावर आता शिवसेना नेत्या आणि विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला आहे. तसेच 21oo रुपयांबाबत देखील मोठं वक्तव्य केलं आहे. त्या जालन्यात बोलत होत्या.
लाडक्या बहिणींना (Ladki Bahin yojna) शासनाच्या वतीने मदत देण्यात आली. त्यापेक्षाही जास्त त्यांचा स्वाभिमान आणि त्यांना स्वतःच्या पायावर उभा राहण्याच्या दृष्टिकोनातून जे पाऊल महायुती सरकारने उचललं होतं, त्यामधून या जिल्ह्यातल्या किती महिलांना मदत मिळालेली आहे. लाडक्या बहिणीचे जे उर्वरित काही प्रश्न असतील ते सोडवण्यासाठी, शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, ऊसतोड कामगारांचे प्रश्न आहेत, अन्य काही योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी या सर्व गोष्टींसाठी उपमुख्यमंत्र्यांनी केलेल्या सूचनेनुसार मी जिल्ह्या जिल्ह्यांमध्ये दौरा करत आहे.
यासंदर्भात मी ठीक ठिकाणी महिलांसोबत बोलत आहे, त्याच्यांकडून माहिती जाणून घेत आहे. महिलांची जी काही 2100 रुपयांची मागणी आहे, त्यावर सरकार योग्यवेळी नक्कीच विचार करेल, मात्र या योजनेवर विरोधकांचं विशेष लक्ष आहे, असा खोचक टोला यावेळी गोऱ्हे यांनी लगावला आहे.
पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, विरोधकांना असं वाटत होतं की लोकसभेला महायुतीला म्हणावं असं यश मिळालं नाही, त्यामुळे त्यांनी विधानसभेच्या निवडणुकीत सुद्धा तीच अपेक्षा धरली होती. परंतु प्रत्यक्षात महायुतीला चांगला यश मिळालं आहे. खोटे नॅरेटीव पसरवणं आणि गैरसमज पसरवणं अशा प्रकारची काम सातत्याने विरोधी पक्ष करत आहेत, त्यामुळे या गोष्टींना महिलांनी बळी पडू नये. पुढच्या काळात महायुती त्यांच्या उपकारांना कधीच विसरणार नाही, हे आश्वासन देण्यासाठीच मी आज जालन्यात आली आहे, असं गोऱ्हे यांनी म्हटलं आहे.