रोहणा (Rohna) :- खरीप हंगामामध्ये कापूस व सोयाबीन उत्पादकांना बाजारभाव नसल्याने आर्थिक नुकसान सहन करावे लागले. त्यामुळे ते नुकसान काही प्रमाणात भरून काढण्यासाठी शासनाने सन २०२३-२४ मध्ये भावांतर योजना राबविली. या योजनेनुसार शेतकऱ्यांना प्रतिहेक्टर पाच हजार रुपये देऊन कमाल मर्यादा तीन हेक्टरनुसार आर्थिक मदत दिली. पण, काही शेतकऱ्यांचे बँक खाते आधार लिंक नव्हते व काहींचे आधार अपडेट व ई-केवायसी नसल्याने रक्कम खात्यात जमा झाली नाही. ती रक्कम शासनाकडे परत गेल्याने अद्यापही शेतकऱ्यांना मिळाली नाही. त्यासाठी शेतकरी शासकीय कार्यालयाचे उंबरठे झिजवत असून, अधिकारीही हात वर करीत आहे. त्यामुळे भावांतर योजनेचे पैसे मिळणार कधी, असा प्रश्न शेतकरी विचारत आहेत.
शासनाने भावांतर योजनेंतर्गत सप्टेंबर २०२४ मध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम वळती केली. परंतु, बहुतांश शेतकऱ्यांच्या बँक खात्यात तांत्रिक अडचणींमुळे रक्कम जमा होऊ शकली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी सर्व तांत्रिक बाबींची पूर्तता केली तरीही सहा महिन्यांपासून शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा झाली नाही. काही शेतकऱ्यांना रक्कम मिळाली व काहींना अद्यापही प्रतीक्षा असल्याने तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. कृषी विभागाला विचारणा केल्यास शासनाला ती रक्कम परत गेली असून, शासनाकडून आता पुन्हा पैसे पाठविले नाही.