अकोला (Akola) :- राज्यातील विमुक्त जाती व भटक्या जमाती (विजाभज), इतर मागास वर्ग (इमाव) आणि विशेष मागास प्रवर्ग (विमाप्र) मधील विद्यार्थ्यांना विदेशात शिक्षणाला जाण्यासाठी शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. परदेश शिक्षण शिष्यवृत्ती योजनेंतर्गत १७ मेपर्यंत अर्ज मागविण्यात आल्याची माहिती इतर मागास बहुजन कल्याण विभागाने दिली.
प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी पदव्युत्तर पदवी, पदव्युत्तर पदविका व पी एच डी अभ्यासक्रमासाठी क्रमवारी २०० च्या आतील असलेल्या परदेशातील शैक्षणिक संस्थांमध्ये शैक्षणिक वर्ष सन २०२५-२६ मध्ये प्रवेश घेतला असेल अथवा प्रवेश घेतील, अशा ७५ विद्यार्थ्यांना दरवर्षी परदेशी शिष्यवृत्ती मंजूर करण्यात येते. परदेशी शिष्यवृत्तीसाठी अर्जाचा नमुना, शासन निर्णय, शिष्यवृत्तीसाठी पात्रतेच्या अन्य महत्त्वाचे अटी व शर्ती आदी सविस्तर माहिती विभागाच्या अधिकृत संकेतस्थळ दिली आहे.
योजनेच्या अटी व शर्ती नुसार विद्यार्थी विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील महाराष्ट्र राज्याचा कायम रहिवासी असावा. विद्यार्थ्यांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न आठ लाखापेक्षा जास्त नसावे. पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी ३५ वर्षे व पीएच.डी. साठी ४० वर्षे ही कमाल वयोमर्यादा असेल. अर्जदार स्वतः किंवा अर्जदाराचे आई वडील विधवा, परित्यक्ता, घटस्फोटित, पती व पत्नीपासून विभक्त राहत असल्यास कायदेशीर कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे. ३० टक्के जागा मुलींसाठी राखीव असतील. एकापेक्षा जास्त वेळेस विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र असणार नाही.