प्रखर उन्हामध्ये सूर्यापासून निघणाऱ्या अतिनील किरणांचे प्रमाण (यूव्ही इन्डेक्स) हे जास्त प्रमाणात असते. अतिनील किरणांच्या जास्तकाल संपर्कात आल्यास त्वचेसंबंधी विविध समस्यांना सामोरे जावे लागते. यालाच ‘सनबर्न’ असेही म्हणतात.
सध्या जिल्ह्यातील तापमान वाढलेले असल्याने यापासून बचाव करण्यासाठी खबरदारी घेणे गरजेचे आहे. सनबर्न म्हणजे त्वचेवर येणारी जळजळ, जी सूर्याच्या अल्ट्राव्हायोलेट किरणांमुळे होते. सनबर्न झाल्यावर त्वचा लाल होते, जळजळ होते आणि कधीकधी पाण्याने भरलेले फोड येतात. यापासून लहान मुलांचा बचाव करावा. त्यांना दुपारच्या सुमारास घराबाहेर पडू देऊन नये.

४४ अंश
सेल्सिअसवर जिल्ह्यातील तापमान पोहोचले आहे. त्यामुळे दुपारी घराबाहेर पडणे धोकादायक ठरू शकते
१५ मिनिटांच्या उन्हात सनबर्नचा धोका
तीव्र उन्हात १५ मिनिटांपेक्षा अधिक वेळ उभे राहिल्यास सनबर्न होण्याचा धोका बळावतो. त्यामुळे नागरिकांनी बाहेर सावलीखाली राहावे. उन्हात राहू नये.
सनबर्न म्हणजे काय ?
सूर्याच्या अतिउष्ण किरणाचा थेट त्वचेवर परिणाम होतो. त्यातून त्वचेवर खाज येते. लालसरपणा येतो. जळजळ होण्यास सुरुवात होते. वेदना जाणवतात. अस्वस्थता निर्माण होते. काहीवेळा त्वचेवर फोड येतात. त्यात पुरळ येते. अशावेळी तापदेखील येतो. उलट्या होतात. अशावेळी संबंधितांना सावलीत घेऊन थंट हवेत ठेवल्यानंतर त्यावर उपचार होतो.
हायड्रेटेड राहावे लागणार
दर दीड तासाने पाणी प्यावे, ताज्या फळांचा सर घ्यावा, नारळ पाणी, लिंबू पाणी, ताक, जीवनसत्त्व व खनिजयुक्त संतुलित आहार घ्यावा, यामुळे शरीर हायड्रेटेड राहण्यास मदत होते.