नागपूर (Nagpur):- नागपुरातील प्राचिन पोद्दारेश्वर राम मंदिरतर्फे श्रीराम नवमीनिमित्त श्रीराम जन्मोत्सव शोभायात्रा ६ एप्रिलला दुपारी ४ वाजता मंदिरातून निघणार आहे. शोभायात्रेचे मोमीनपुरासह चार ठिकाणी मुस्लिम बांधवांकडून स्वागत केले जाईल. या शोभायात्रेत सर्व धर्मिय सहभागी होतात, अशी माहिती शोभायात्रा आयोजन समितीतर्फे शुक्रवारी मंदिरात झालेल्या पत्रकार परिषदेत दिली गेली.
पोद्दारेश्वर राम मंदिरचे प्रबंधक विश्वस्त पुनीत पोद्दार पत्रपरिषदेत म्हणाले, श्रीराम जन्मोत्सव शोभायात्राचे यंदा ५८ वे वर्ष आहे. पोद्यादारेश्वर मंदिरापासून काही अंतरावर मोमीनपुरा ही मुस्लिमांची वस्ती आहे. रामनवमनीनिमित्त निघणारी शोभायात्रेत प्रत्येक वर्षी मुस्लीम समुदायातील अनेक लोक सभागी होतात. यंदाही शोभायात्रेचे मोमीनपुरा, नालसाहब चौकसह इतर दोन ठिकाणी अशा एकूण चार ठिकाणी मुस्लिम बांधवांकडून शोभायात्रेचे स्वागत केले जाणार आहे. त्याबाबत काही दिवसांपूर्वी माजी मंत्री अनिस असमद, माजी नगरसेवकांसह मुस्लिम समुदारातील मान्यवरांसोबत बैठकही झाली आहे. तेही शोभायात्रेच्या कार्यक्रमात सहभागी होतील.
दरम्यान मंदिर समितीकडूनही प्रत्येक वर्षी नित्याने ईद वा इतर उर्सच्या रॅलीचे स्वागत केले जाते. पुढेही ही प्रथा कायम राहणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले. नागपुरात नुकतेच झालेल्या हिंसाचाराचा हिंदु- मुस्लिम बांधवातील सद्भावनेवर काहीही परिणाम होणार नाही. आता मध्य नागपुरातील स्थिती सामान्य असल्याचेही पत्रकार परिषदेत सांगण्यात आले. दरम्यान यंदाच्या शोभायात्रेत ९० हून जास्त दर्शनी सथ वा पथके सर्वसामान्यांचे लक्ष वेधून घेणार आहे. त्यात नुकत्याच झालेल्या कुंभ मेळ्याशी संबंधितही एक आकर्षक रथ राहणार असल्याचेही यावेळी आयोजकांकडून सांगण्यात आले.