केंद्रावर विध्यार्थ्यांपेक्षा शिक्षकांचीच जास्त गर्दी
अहेरी (Aheri):- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणारी दहावीची बोर्डाची परीक्षा 21 फेब्रुवारी म्हणजेच शुक्रवारपासून सुरू झाली आहे.आज पहिला पेपर मराठी या मातृभाषेचा सुरू आहे.परीक्षेदरम्यान राजाराम (खां) येथील केंद्रावर विध्यार्थ्यांपेक्षा शिक्षकांचीच जास्त गर्दी पहावयास मिळत आहे.त्यामुळे परीक्षा विद्यार्थ्यांची की,शिक्षकांची ? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
अहेरी तालुक्यातील राजाराम खांदला येथील भगवंतराव आश्रम शाळेत परीक्षा केंद्र असल्याने जवळपास पाच शाळेतील विध्यार्थी दहावीची परीक्षा देत आहेत.देशभरात कॉपीमुक्त अभियान राबविण्यात येत आहे.राज्यात देखील मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी व्हिडीओ कॉन्फरन्स घेऊन परीक्षा केंद्रावर गैरप्रकार आढळल्यास कडक कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.नुकतेच बारावीची परीक्षा सुरू असताना मुलचेरा तालुक्यातील एका परीक्षा केंद्रावर माध्यमिक शिक्षणाधिकारी भुसे यांच्या भेटी दरम्यान गैरप्रकार आढळताच मोठी कारवाई देखील केली.या कारवाईने जिल्ह्यातच खळबळ माजली होती.
असे असताना देखील दहावीच्या पहिल्याच पेपर ला राजाराम (खांदला) येथील परीक्षा केंद्रावर परीक्षा सुरू असताना मोठ्या प्रमाणात शिक्षक आढळून आले.ही शाळा निवासी असली तरी परीक्षा सुरू असताना तिथे कुणालाच थांबता येत नाही.मात्र,मुख्याध्यापक आणि शिक्षक या ठिकाणी काय करत असावे ? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.त्यामुळे जि.प. शिक्षण विभाग आणि प्रकल्प अधिकाऱ्यांनी या गंभीर बाबीकडे लक्ष देऊन परीक्षा शांततेत पार पाडावी याकडे लक्ष देण्याची मागणी सुज्ञ पालकांनी केली आहे.