नवी दिल्ली : भारतीय लष्करी सेवेतील (Indian Army) भरतीसाठी केंद्रातील भाजप सरकारने आणलेल्या व लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात विरोधकांच्या टीकेचे लक्ष्य ठरलेल्या अग्निपथ योजनेत (Agnipath Scheme) बदल होण्याची शक्यता आहे. या योजनेअंतर्गत होणाऱ्या भरती प्रक्रियेत हे बदल होऊ शकतात.भारतीय लष्कर सध्या एक अंतर्गत सर्वेक्षण करत आहे. यात अग्निवीरशी संबंधित प्रश्न विचारले जात आहेत. या योजनेचा भरती प्रक्रियेवर होणारा परिणाम जाणून घेणे हा त्याचा उद्देश आहे. या महिन्याच्या अखेरीस संपण्याची शक्यता आहे.या अग्निवीर, कर्मचारी भरती आणि प्रशिक्षण यांच्यासह सर्व संबंधितांकडून काही माहिती मागविण्यात आली आहे.
अग्निवीर आणि जुने सैनिक
युनिट आणि सब-युनिट कमांडर्सना अग्निवीर आणि या योजनेपूर्वी आलेल्या सैनिकांच्या कामगिरीबद्दल अभिप्राय देखील द्यावा लागेल. यासोबतच त्यांनी अग्निवीरमध्ये कोणत्या सकारात्मक किंवा नकारात्मक गोष्टी पाहिल्या आहेत हे देखील सांगावे लागेल. या माहितीच्या आधारे लष्कर योजनेत काही बदल करण्याची शिफारस करू शकते, असे वृत्त आहे.