सोशल मीडियावरचा शहाणपण शिकवू नका
सध्या छोट्या पडद्यावर नव्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. छोट्या पडद्यावर आता अभिनेता सुबोध भावेची महत्त्वाची भूमिका असलेली ‘तू भेटशी नव्याने’ ही नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या मालिकेच्या माध्यमातून पहिल्यांदाच एआय तंत्रज्ञानाचा वापर छोट्या पडद्यावर व्यक्तीरेखेसाठी होणार आहे. एआयच्या वापरावर काही कलाकारांनी टीका केली होती. या टीकाकारांना अभिनेता सुबोध भावेने सुनावले आहे. सोशल मीडियावरचा शहाणपण मला शिकवू नका असेही त्याने ठणकावले.
सोनी मराठी वाहिनीवर ‘तू भेटशी नव्याने’ ही मालिका येत्या 8 जुलैपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेत सुबोध भावे दुहेरी भूमिकेत झळकणार आहे. या दोन्ही भूमिकांमध्ये 20 ते 25 वर्षांचे अंतर आहे. महाविद्यालयीन जीवनातील सुबोध भावेच्या व्यक्तीरेखेसाठी एआय तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. सुबोधच्या व्यक्तिरेखेसाठी एआयच्या वापराऐवोजी एखाद्या नवख्या तरुण कलाकाराला काम दिले पाहिजे असा सूर काहींचा होता. त्यावर सुबोध भावे याने आपली सडेतोड भूमिका मांडली आहे.
सुबोध भावेने ‘इट्स मज्जा’शी संवाद साधताना म्हटले की, “AI च्या वापरामुळे कुणाच्या पोटावर आणलेला नाही. लहानपण मीच करायचं असं जर ठरवलं असतं तर कुणाला घेणार होतो. दुसरं म्हणजे सध्या मराठीत 35 मालिका सुरू आहेत. त्यातील एका मालिकेत मी काम करत आहे. आता माझ्यामुळे 34 मालिकांमधील कलाकारांच्या पोटावर पाय आला नाही ना असा सवालही त्याने केला. सुबोध भावे यांनी पुढे म्हटले की, मीदेखील एक अभिनेता आहे, त्यामुळे जोपर्यंत मी मरत नाही तोपर्यंत मी अभिनय करत राहणार आहे”.