सोलापूर: सोलापूर शहर व जिल्ह्यात विजेचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस पडला. शहरात दोन ठिकाणी झाड पडले. सखल भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. ग्रामीण भागातही पावसाने सर्वदूर हजेरी लावली. या पावसामुळे आंबा, डाळिंब, काढणीला आलेला कांदा व भुईमूग अशा पिकांना फटका बसला आहे. मंगळवारी ३९.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. पण, दुपारी पावणे पाचनंतर सायंकाळी साडेसहापर्यंत विजेचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह सोलापूर शहरात दमदार पाऊस झाला. या अवकाळी पावसामुळे चाकरमान्यांची चांगलीच धावपळ उडाली. तसेच सोलापूर शहरातील विविध ठिकाणी सखल भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते.
एसटी स्टँड परिसर, रंगभवन चौक, निराळी वस्ती रोड, सम्राट चौक येथील सखल भागात पाणी साचल्याने नागरिकांसह दुचाकीस्वारांची पंचाईत झाली. दुसरीकडे डफरीन हॉस्पिटलच्या संरक्षक भिंतीवर मोठ्या झाडाची फांदी तुटून पडली. यामुळे काही वेळ वाहतुकीस अडथळा निर्माण झाला होता.