पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याच्या क्षणी महाराष्ट्रातील वेगवेगळ्या ठिकाणचे अनेक पर्यटक उपस्थित होते. त्यातील 6 जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे. तर काहीजण जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
ठाणे जिल्ह्यातील डोंबिवलीमधील तीन पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. संजय लेले, अतुल मोने आणि हेमंत जोशी अशी मृतांची नावे आहेत. पनवेलमधील एक तर पुण्यातील दोन जणांचा मृतांच्या यादीत समावेश आहे.
जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये मंगळवारी पर्यटकांवर सशस्त्र हल्ला झाला आहे. अधिकाऱ्यांनी बीबीसीला दिलेल्या माहितीनुसार, ‘सशस्त्र कट्टरतावाद्यांनी पर्यटकांवर गोळीबार केला. या गोळीबारात 26 लोकांचा मृत्यू झाला आहे.’
पनवेलच्या दिलीप देसले (वय 60) यांचा हल्ल्यात मृत्यू झाला आहे. त्यांच्या सोबत असलेले सुबोध पाटील (वय 42) हे जखमी असून त्यांच्यावर सध्या श्रीनगर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
पुण्यातील संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणबोटे यांचा मृत्यू झाल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. जगदाळे यांच्या पत्नीवर उपचार सुरू आहेत.
या हल्ल्यावेळी एक नागपूरचे कुटुंबसुद्धा तिथे होते. गोळीबाराचा आवाज ऐकून त्यांनी पहाडावरुन उड्या मारल्या आणि त्यात घसरुन सिमरन रुपचंदानी या जखमी झाल्या आहेत. त्यांच्या पायाला फ्रॅक्चर झालं आहे. त्यांच्यासमवेत तिलक आणि गर्व रुपचंदानी हेसुद्धा आहेत. तिघेही सुखरुप आहेत. त्यांच्याशी संपर्क झाला असून, त्यांना सर्व ती मदत पुरवण्यात येत आहे.
सध्या उपलब्ध झालेल्या माहितीनुसार, पुण्यातील संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणबोटे, रायगडमधील दिलीप देसले, ठाणे जिल्ह्यातील अतुल मोने, हेमंत जोशी आणि संजय लेले यांचा मृतांमध्ये समावेश आहे.
राज्यातील मृतांचे पार्थिव शरीर मुंबई आणि पुण्यात विमानाने आणले जाणार आहे. चार जणांचे पार्थिव शरीर मुंबईत येणार आहे तर दोन जण जणांचे पार्थिव शरीर पुण्यात आणले जाईल. या व्यतिरिक्त हल्ल्यात सुमित परमार, यतिश परमार या दोन जणांचा समावेश आहे. त्यांचे पार्थिव शरीर मुंबईत आणले जाणार आहे.
संजय लेले साधारण 50 वर्षांचे होते. ते मुंबईतील एका फार्मा कंपनीत कामाला होते. त्यांना साधारण 18 वर्षांचा मुलगा आहे. त्यांचे चुलत बंधू कौशिक लेले यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं, “आम्हाला काल रात्री कळालं. कुटुंबीयांना धक्का बसला. मन सुन्न करणारी घटना आहे. आपण पर्यटनाला तिकडे जातो आणि असं काहीतरी होतं हे दुर्देवी आहे.”
43 वर्षीय संजय मोने हे डोंबिवली पश्चिम येथील ठाकूरवाडी येथे राहायचे. दोन दिवसांपूर्वी मोने यांचं संपूर्ण कुटुंब काश्मीरला पर्यटनासाठी गेलं होतं. अतुल मोने मध्य रेल्वेत सीनीयर सेक्शन इंजिनिअर म्हणून काम करत होते. पत्नी आणि 18 वर्षीय मुलीसह ते काश्मीरला गेले होते.