अखेर, दीर्घ प्रतीक्षेनंतर, भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला आणि इतर ३ प्रवाशांना घेऊन अॅक्सिओम-४ मिशन आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाकडे (ISS) रवाना झाले. नियोजित वेळेनुसार दुपारी १२.०१ वाजता हे मिशन प्रक्षेपित करण्यात आले. यापूर्वी, स्पेसएक्सने जाहीर केले होते की आज बुधवारी होणाऱ्या संभाव्य उड्डाणासाठी हवामान ९० टक्के अनुकूल आहे.
भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला (Shubanshu Shukla) आज, २५ जून रोजी अॅक्सियम मिशन ४ अंतर्गत आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकासाठी रवाना झाले. त्यांच्यासोबत इतर तीन अंतराळवीरही अंतराळ स्थानकात जात आहेत. अवकाशात पोहोचल्यानंतर शुभांशू म्हणाले – व्हॉट ए राईड. प्रक्षेपण यशस्वी झाल्यावर शुभांशूचे पालक आशा शुक्ला आणि शंभू दयाळ शुक्ला भावूक झाले.
भारतीय वेळेनुसार दुपारी १२:०० वाजता फ्लोरिडा येथील नासाच्या केनेडी स्पेस सेंटर येथून हे मिशन लाँच करण्यात आले. सर्व अंतराळवीर स्पेसएक्सच्या फाल्कन-९ रॉकेटला जोडलेल्या ड्रॅगन कॅप्सूलमधून उड्डाण केले. ड्रॅगन अंतराळयान सुमारे २८.५ तासांनंतर २६ जून रोजी दुपारी ४:३० वाजता आयएसएसशी जोडले जाईल.
अमेरिकन अंतराळ संस्था नासा आणि भारतीय संस्था इस्रो यांच्यातील करारानुसार, भारतीय हवाई दलाचे ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला यांची या मोहिमेसाठी निवड करण्यात आली आहे. शुभांशू हे आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाला भेट देणारे पहिले भारतीय आणि अंतराळात जाणारे दुसरे भारतीय असतील. ४१ वर्षांपूर्वी राकेश शर्मा (Rakesh Sharma) यांनी १९८४ मध्ये सोव्हिएत युनियनच्या अंतराळयानातून अंतराळ प्रवास केला होता.