Friday, June 20, 2025
spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

Related Posts

शरद पवार-मुख्यमंत्र्यांची तासभर बैठक | lokvahini News | लोकवाहिनी | Marathi News

शरद पवार-मुख्यमंत्र्यांची तासभर बैठक

जरांगे आणि हाकेंच्या आंदोलनावर चर्चा

सध्या मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील वातावरण तापले आहे. काही दिवसांपूर्वी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी खासदार शरद पवार यांची भेट घेत सध्या राज्यातील वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न केला जात आहे. तुम्ही आरक्षणाच्या मुद्द्यावर तोडगा काढण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी केली होती. विशेष म्हणजे शरद पवार यांनीदेखील या मागणीला सकारात्मक प्रतिसाद दिला होता. त्यांनंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शरद पवार यांची मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर पंधरा मिनिटे एकत्रित चर्चा झाली आहे.
———-
हिरामण खोसकरांकडून एकनाथ शिंदेंचं तोंडभरून कौतुक

ठाण्यातील आनंदाश्रमात भेट घेतली.

विधानपरिषद निवडणुकीत काँग्रेसची 7 मतं फुटल्याचं चर्चा आहे. काही आमदारांनी क्रॉस व्होटींग केलं असून या आमदारांवर कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जात असतानाच इगतपुरीचे काँग्रेस आमदार हिरामण खोसकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ठाण्यातील आनंदाश्रमात भेट घेतली. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. आता हिरामण खोसकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे तोंडभरून कौतुक केले आहे.
———–

 

भाजपनंतर मनसेनेही विधानसभेचे रणशिंग फुंकलं

राज ठाकरेंकडून प्रत्येक मतदारसंघाचा आढावा घेण्यास सुरुवात

सध्या राज्यात विधानसभा निवडणुकांची धामधूम सुरु आहे. भाजप, काँग्रेस, शिवसेना एकनाथ शिंदे गट, राष्ट्रवादी अजित पावर गट, शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून विधानसभेसाठी चाचपणी सुरु आहे. तर काही पक्षात इनकमिंग आऊटगोईंगही सुरु झाले आहे. आता आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनाही जोरदार कामाला लागली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे विधानसभेच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक जिल्हानिहाय विधानसभेचा आढावा घेणार आहे.
———-
मध्य रेल्वे पुन्हा विस्कळीत

एक्सप्रेसच्या इंजिनमध्ये बिघाड

रोज मरे त्याला कोण रडे’ अशी काहीशी परिस्थिती मध्य रेल्वेची झाली आहे. कल्याण, डोंबिवली, टिटवाळा, अंबरनाथ, कर्जत, ठाणे या ठिकाणी राहणाऱ्या प्रवाशांना दररोज मध्य रेल्वेच्या सावळ्या गोंधळाचा त्रास सहन करावा लागत आहे. पावसात मध्य रेल्वेच्या समस्या वाढतच जातात. आता मध्य रेल्वेच्या प्रवाशांना पुन्हा एकदा त्रास सहन करावा लागणार आहे. डोंबिवली आणि कल्याणदरम्यान एका एक्सप्रेस गाडीच्या इंजिनमध्ये बिघाड झाल्याने मध्य रेल्वेची वाहतूक कोलमडली आहे. त्यामुळे घरी परतणाऱ्या प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
————
निलेश लंकेंच्या होमग्राऊंडवर अजित पवारांचं जोरदार भाषण

शेतकऱ्यांसाठी गेमचेंजर योजना

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोमवारी अहमदनगरच्या दौऱ्यात जोरदार भाषण करताना शेतकरी आणि महिला वर्गाला साद घालण्याचा प्रयत्न केला. शरद पवार गटाचे निलेश लंके हे नगरचे खासदार आहेत. त्यांचे होमग्राऊंड असलेल्या पारनेरमध्ये अजित पवार यांची सभा झाली. अजित पवार यांचा वाढदिवस आहे. त्यामुळे रस्त्यात लोकांच्या भेटीगाठी घेत येताना अजित पवार यांना पारनेरमध्ये पोहोचायला उशीर झाला. मात्र, त्यानंतर अजित पवार यांनी जोरदार भाषण ठोकत आगामी काळात राज्य सरकारच्या योजनांमुळे शेतकरी आणि महिला वर्गाचे कशाप्रकारे भले होणार आहे, हे सविस्तरपणे सांगितले.
————-
अमित शाहांना महाराष्ट्रातून मराठा जात संपवायचीय

मनोज जरांगेंचा गंभीर आरोप

राज्यातील मराठा आरक्षणाचा प्रश्न जटील व गुंतागुंतीचा बनला असून भाजपच्या अधिवेशनातही या प्रश्नावरुन खलबतं झाली आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर भाष्य केलं. त्यानंतर, आज राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन मराठा-ओबीसी आरक्षणावर चर्चा केलीय. मात्र, अमित शाह यांनी आपल्या भाषणातून शरद पवार यांच्यावर टीका करताना मराठा आरक्षणाचाही संदर्भ दिला होता. आता, अमित शाह यांच्या महाराष्ट्रातील दौऱ्यासंदर्भात मनोज जरांगे यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर, बोलताना ते मोठे लोकं आहेत, ते कधी लक्ष घालणार, ते मोठे लोक आहेत, ते गरिबांच्या ढुंगणावर लाथ मारतात, अशा शब्दात अमित शाह यांच्या दौऱ्यावर भाष्य केलं. तसेच, त्यांना महाराष्ट्रातून मराठा जात संपवायची आहे, असा गंभीर आरोपही जरांगे यांनी केलाय.
————

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Popular Articles