दिग्गजांनी बजावला मतदानाचा अधिकार
नवी दिल्ली, 25 मे : लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यात राजधानी दिल्लीतही मतदान होत आहे. अशा स्थितीत अनेक बडे नेतेही मतदानाचा हक्क बजावण्यासाठी बूथवर पोहोचले. परराष्ट्र मंत्री एस जयशंकर, हरियाणाचे माजी मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर, बन्सुरी स्वराज यांच्यासह अनेक बड्या नेत्यांनी मतदानात भाग घेतला आणि लोकांना उत्साहाने मतदान करण्याचे आवाहन केले. परराष्ट्र मंत्री एस जयशंकर सकाळीच मतदान केंद्रावर पोहोचले, 20 मिनिटे रांगेत उभे राहिल्यानंतर त्यांना त्यांचे नाव मतदान यादीत नसल्याचे कळले. यानंतर त्यांना मतदान न करताच परतावे लागले.
मिळालेल्या माहितीनुसार, घरी पोहोचल्यानंतर त्यांनी तपासणी केली तेव्हा त्यांना दुसऱ्या मतदान केंद्रावर त्यांचे नाव असल्याचे समजले. परराष्ट्र मंत्री शनिवारी सकाळी मतदान करण्यासाठी तुघलक येथील अटल आदर्श शाळेत पोहोचले होते. तेथे 20 मिनिटे रांगेत थांबल्यानंतर अधिकाऱ्यांनी त्यांचे नाव यादीत नसल्याचे सांगितले. यानंतर त्यांनी तपासणी करून दुसरे मतदान केंद्र गाठले आणि मतदानाचा हक्क बजावला. एस जयशंकर यांना त्यांच्या मतदान केंद्रावरील पहिला पुरुष मतदार म्हणून जिल्हा निवडणूक कार्यालयाने प्रमाणपत्रही दिले. त्यानुसार एस जयशंकर हे मतदारसंघ 04 मधील बुथ क्रमांक 53 वर मतदान करणारे पहिले पुरुष मतदार होते. परराष्ट्र मंत्र्यांनीही त्यांचे छायाचित्र सोशल मीडियावर शेअर केले आहे. दिल्लीच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, राजधानीत एकूण 13641 मतदान केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत. यापैकी 2891 बूथ संवेदनशील आहेत.
परराष्ट्र मंत्र्यांनी मतदानाचा हक्क बजावल्यानंतर लोकांना आवाहन केले की, या निर्णायक काळात लोकांनी घराबाहेर पडून मतदान करावे. मला विश्वास आहे की भाजप पुन्हा एकदा सत्तेत येईल. सकाळी सात वाजता मतदानाला सुरुवात झाली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही जनतेला उत्साहाने मतदान करण्याचे आवाहन केले. दिल्लीत दिल्लीचे मंत्री आतिशी, गौतम गंभीर, रवींद्र रैना, हरदीप सिंग पुरी, व्हीके पांडियन, दुष्यंत चौटाला आणि संजय अरोरा यांच्यासह अनेक नामवंत लोकांनी मतदान केले आहे.