विधानसभा निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता
भाजपची पहिली यादी या दिवशी येणार
येत्या सप्टेंबरच्या दुसऱ्या-तिसऱ्या आठवड्यात विधानसभा निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता आहे. यामुळे ऑगस्टच्या अखेरच्या आठवड्यात भाजपा सर्व राज्यांच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्याची तयारी करत आहे. सर्व राज्यांत प्रभारी नियुक्त करण्यात आले आहेत. तसेच काही बैठकाही झाल्या आहेत.
भाजप या महिन्याच्या अखेरीस तीन राज्यांची पहिली यादी जाहीर करण्याची शक्यता आहे. यात महाराष्ट्रातील ३० ते ३५ जागांवरील उमेदवार, हरियाणातील २० आणि झारखंडच्या २५ उमेदवारांची घोषणा होण्याची शक्यता आहे. यासाठी भाजपाने फॉ़र्म्युला ठरविला आहे. पहिल्या यादीत अशा जागा असतील ज्या गेल्या निवडणुकीत भाजपा हरली होती किंवा कमी अंतराने जिंकली होती. या जागांवर तयारीसाठी उमेदवाराला वेळ मिळावा म्हणून पहिली यादी जाहीर केली जाण्याची रणनिती भाजपाने आखली आहे. या जागा मुख्यता एससी, एसटी आरक्षणाच्या असणार आहेत.
बाबा सिद्धनाथ मंदिरात चेंगराचेंगरी, 7 ठार, 9 जखमी
बिहारच्या जहानाबाद येथील घटना
बिहारच्या जहानाबाद जिल्ह्यातील मखदुमपूर येथील बाबा सिद्धनाथ मंदिरात श्रावण महिन्याच्या सोमवारी भाविकांच्या मोठ्या गर्दीमुळे चेंगराचेंगरी झाली. या घटनेत सातजण ठार झाले असून नऊ जण गंभीर जखमी झाले आहेत. श्रावण महिन्याच्या सोमवारी, शिवलिंगावर जलाभिषेक करण्यासाठी मोठ्या संख्येने भाविक मंदिरात जमा झाले होते. मंदिरातील गर्दी हाताळण्यासाठी प्रशासनाने कडेकोट सुरक्षा उपाययोजना केल्या होत्या. मात्र, प्रचंड गर्दीमुळे रांगेत उभ्या असलेल्या भक्तांमध्ये धक्काबुक्की झाली. या गोंधळात रेलिंग तुटल्याने चेंगराचेंगरी झाली. घटनास्थळी पोलीस आणि प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तत्काळ धाव घेतली. दुर्घटनेत जखमी झालेल्यांना तातडीने जहानाबाद हॉस्पिटल आणि मखदुमपूर रेफरल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी यापैकी सातजणांना मृत घोषित केले, तर उर्वरित जखमींवर उपचार सुरू आहेत. मृतांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे, आणि मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मराठा आरक्षणावर सर्वपक्षीय बैठक बोलवा
शरद पवार यांचा मुख्यमंत्री शिंदेंना सल्ला
मुख्यमंत्री शिंदे यांनी मराठा आरक्षणाबाबत सर्वपक्षीय बैठक बोलवावी. मनोज जरांगे यांच्यासह इतर सर्व नेतृत्वांना या बैठकीला बोलवावे. तसेच राजकीय पक्षांतील प्रमुख नेत्यांनाही या बैठकीचे निमंत्रण द्यावे अशी सूचना शरद पवार यांनी मुख्यमंत्री शिंदे एकनाथ यांना केले. केंद्र सरकारला 50% ची मर्यादा वाढवण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. जरांगे पाटील आगामी विधासभा निवडणुकीत उतरण्याच्या तयारीत आहे. याविषयी शरद पवारांना विचारले असता ते म्हणाले,लोकशाहीत मागण्याचा आणि निवडणूक लढवण्याचा प्रत्येकाचा आधिकार आहे.
महाराष्ट्रातला हा पहिला उठाव असणार
जरांगे पाटलांचा राज्य सरकारला इशारा
महाराष्ट्र्र सरकारने जर आरक्षण नाही दिले तर सगळ्या जागा आम्ही लढवणार आहोत. राखीव मराठे तर सगळे लढवणार. बाकीच्या जागेंवर सगळ्या जातीधर्माचे लोक आम्ही देणार आहोत. आम्ही सगळ्यांना निवडून आणू. हा महाराष्ट्रातला पहिला उठाव असेल. सर्वसामान्य लोक सत्तेत गेले हे ७५ वर्षात पहिल्यांदा घडणार. असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी (Manoj Jarange Patil) राज्य सरकारला दिला आहे. जरांगे पाटील राज्यात शांतता रॅली काढत आहेत. ही रॅली काल पुण्यात दाखल झाली होती. रॅलीचे जल्लोषात स्वागत कात्रज येथे करण्यात आले. त्यानंतर ही रॅली स्वारगेटमार्गे सारसबागेसमोर आली आणि तिथून डेक्कन येथे रॅलीचा समारोप झाल्यानंतर जरांगे पाटील यांनी उपस्थित सर्वांशी संवाद साधला. काल रात्री तब्बेतीच्या कारणास्तव पुण्यातच थांबले होते. आज सकाळी पुन्हा त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
विधानसभेसाठी भाजपचा फॉर्म्युला ठरला?
लवकरच जागावाटपाची चर्चा, आशिष शेलारांची माहिती
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्वच राजकीय पक्षांनी तयारी सुरु केली आहे. गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडी आणि महायुतीतील सर्वच घटक पक्षांच्या अनेक बैठका सुरु आहेत. तसंच, प्रत्येक पक्षाकडून दावे-प्रतिदावे केले जाऊ लागले आहेत. दरम्यान, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नुकतीच भाजपच्या कोअर कमिटीच्या नेत्यांची बैठक पार पडली. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार झाली. भाजपचे वरिष्ठ नेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात झालेल्या या बैठकीला भूपेंद्र यादव, विनोद तावडे उपस्थित होते. या बैठकीत आगामी विधानसभा निवडणुकीची रणनीती आखण्यात आली. या बैठकीत विधानसभा निवडणूक, जागावाटप, जागांची निवड यांसह विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. या बैठकीनंतर भाजप नेते आशिष शेलार यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला.
पीओपी मूर्तीची विक्री थांबविण्यासाठी नवीन प्रयोग
नागपुरातील पारंपरिक मूर्तीकारांना संघटना देणार ओळखपत्र
प्लास्टर ऑफ पॅरिस अर्थात पीओपीऐवजी मातीच्या मूर्तीची विक्री व्हावी, पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा व्हावा, या उद्देशाने शहरातील पारंपरिक मूर्तीकारांना ओळखपत्र देण्यात येणार आहे. यासाठी पारंपरिक मूर्तीकार हस्तकला व कारागिर संघाने पुढाकार घेतल्याची माहिती देण्यात आली.
78 कोटी रुपये किमतीचे 51.95 किलो मेफेड्रोन जप्त
महसूल गुप्तचर संचालनालयाची नागपूरात कारवाई
महसूल गुप्तचर संचालनालयाने नागपुरातील मेफेड्रोन कारखान्याचा पर्दाफाश केला. सुमारे 78 कोटी रुपये किमतीचे 51.95 किलो मेफेड्रोन द्रव स्वरूपात जप्त करण्यात आले असून यासोबत कच्चा माल आणि उपकरणे देखील जप्त करण्यात आली आहेत. नागपूर शहरातील पाचपावली परिसरात एका बांधकामाधीन इमारतीत गुप्तरित्या मेफेड्रोनचे उत्पादन सुरू असल्याची गोपनीय माहिती महसूल गुप्तचर संचालनालयाच्या मुंबई क्षेत्रीय युनिटला मिळाली होती. या विशिष्ट माहितीच्या आधारे नुकतीच एक सुसंघटित शोध मोहीम राबविण्यात आली. मेफेड्रोनच्या उत्पादनासाठी आवश्यक असलेली सर्व रसायने, साहित्य आणि यंत्रसामग्रीने सुसज्ज एक छोटी प्रयोगशाळा या इमारतीत उभारण्यात आल्याचे या शोध मोहिमेत आढळून आले. या कटाच्या म्होरक्याने प्रथम यंत्रसामग्रीचा संपूर्ण संच खरेदी केला आणि प्रयोगशाळा उभारली तसेच 100 किलोपेक्षा जास्त मेफेड्रोन तयार करण्याची क्षमता असलेला कच्चा माल देखील जमा केला.