मोठे कारण आलं समोर
पुणे– कल्याणीनगर येथील अपघाताप्रकरणी अल्पवयीन आरोपीच्या आजोबांना अटक करण्यात आली आहे. सुरेंद्र अग्रवाल यांना पुणे पोलिसांनी अटक केली आहे. चालकाला डांबून ठेवल्याप्रकरणी ही अटक करण्यात आली आहे.
त्यामुळे आरोपी अल्पवयीन मुलाच्या कुटुंबाचे पाय खोलात जात असल्याचं चित्र आहे.
अल्पवयीन आरोपीने मद्य पिऊन आलिशान पोर्शे कार चालवली. त्याने एका टूव्हीलरला धडक दिली अन् यात दोघांचा जागीच मृत्यू झाला. अल्पवयीन असल्याने आरोपीला १५ तासाच्या आत जामीन देखील मिळाला. हे प्रकरण चांगलंच तापलं आहे. आता या प्रकरणाला नवीन ट्विस्ट मिळाला आहे. कारण, आरोपीचे आजोबा सुरेंद्र अग्रवाल यांनी चालकाला डांबून ठेवल्याचा आरोप आहे. याप्रकरणी त्यांना अटक करण्यात आली आहे.
पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी याप्रकरणी शुक्रवारी पत्रकार परिषद घेऊन महत्त्वाची माहिती दिली होती. आपण कार चालवली असं सांगण्यासाठी चालकावर दबाव टाकण्यात आला होता. कोणी दबाव टाकला याचा शोध घेण्यात येईल, असं अमितेश कुमार म्हणाले होते. त्यानंतर आज अल्पवयीन आरोपीच्या आजोबांना अटक करण्यात आलीये. त्यांनी चालकाला धमकवल्याचा आणि डांबून ठेवल्याचा आरोप आहे.
शुक्रवारी येरवाडा पोलीस स्टेशनमधील दोन अधिकाऱ्यांचे निलंबन करण्यात आले आहे. कामात निष्काळजीपणा दाखवल्याप्रकरणी ही अटक करण्यात आली आहे. आरोपीला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याऐवजी त्याला पोलीस स्टेशनमध्ये आणण्यात आले असा ठपका ठेवण्यात आला आहे. याप्रकरणी तपास अधिकारी देखील बदलण्यात आला आहे. त्यामुळे या प्रकरणी गेल्या काही दिवसात मोठ्या घडामोडी घडत असल्याचं दिसत आहे.
पुण्यातील अपघाताप्रकरणी काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर आक्रमक झाले आहेत. त्यांनी आयुक्त अमितेश कुमार यांच्या बदलीची मागणी केली आहे. दरम्यान, याप्रकरणी अल्पवयीन आरोपीच्या वडिलांच्या पोलीस कोठडीमध्ये वाढ करण्यात आली आहे. त्यांची चौकशी सुरु आहे. शिवाय पोर्शेच्या चालकाला देखील ताब्यात घेण्यात आले आहे. त्याचीही चौकशी सुरु आहे. आरोपीवरील गुन्ह्यांच्या कलमामध्ये वाढ करण्यात आली आहे.