जम्मू काश्मीर (Jammu Kashmir) :- जम्मू काश्मीरमधील पहलगाम येते झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर, पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी पहिल्यांदाच जम्मू आणि काश्मिर दौऱ्यावर आहेत. दरम्यान त्यांनी जगातील सर्वात उंच रेल्वे पूल ‘चिनाब ब्रिज’चे उद्घाटन केले आणि तो देशाला समर्पित केला. यावेळी जनतेला संबोधित करताना पंतप्रधान मोदी यांनी पाकिस्तानवर थेट हल्ला चढवत, ‘त्यांनी पहलगाममध्ये मानवता आणि काश्मिरीयत (काश्मीरची सांस्कृतिक ओळख) यावर अत्यंत निंदनीय हल्ला केला असल्याचे म्हटले आहे. पंतप्रधानांच्या या विधानानंतर पाकिस्तानचा अक्षरशः तिळपापड उडाला आहे.
पंतप्रधान मोदी (Prime minister Narendra Modi) म्हणाले, “पाकिस्तान हा गरिबांची भाकरी आणि रोजगाराचाही शत्रू बनला आहे. तसेच, जो कुणी काश्मीरचा विकास रोखण्याचा प्रयत्न करेल, त्याला सर्वप्रथम नरेंद्र मोदीचा सामना करावा लागेल,” असेही मोदी म्हणाले. पंतप्रधान मोदींच्या या विधानावर पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने प्रतिक्रिया देत, “भारताच्या पंतप्रधानांनी जम्मू आणि काश्मीरसंदर्भात जी खोटी आणि दिशाभूल करणारी विधाने केली आहेत, ती पाकिस्तान पूर्णपणे फेटाळतो,” असे म्हटले आहे.
पाकिस्तानी परराष्ट्र मंत्रालयाने पुढे म्हटले आहे की, “अशी विधाने म्हणजे जगाचे लक्ष खऱ्या मुद्द्यांपासून भरकटवण्याचा प्रयत्न आहे. विशेषतः अशा भागात, जेथे लोकांसोबत योग्य व्यवहार केला जात नाही. तसेच, भारतीय पंतप्रधानांनी पुन्हा एकदा कुठल्याही पुराव्यांशिवाय, पहलगाम हल्ल्यासाठी पाकिस्तानला दोषी ठहरवले, यांचेही आम्हाला दुःख आहे.”