गडचिरोली (Gadchiroli) :- राज्य सरकारच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या मॅट्रिकपूर्व सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत ३१ मार्चला ५ हजार ६५७ विद्यार्थ्यांच्या खात्यात एका क्लिकवर एक कोटी २८ लाख रुपयांचा निधी जमा करण्यात आला. यामुळे ओबीसी व भटक्या विमुक्त प्रवर्गातील गरजू विद्यार्थिनींना आधार मिळाला आहे.
महाराष्ट्रातील अल्पसंख्याक समुदायातील विद्यार्थिनींना आर्थिक साहाय्य मिळावे, त्यांचे शिक्षणातील गळतीचे प्रमाण कमी व्हावे, त्यांच्या शिक्षणाचा दर्जा वाढावा, यासाठी सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना राबविण्यात येते.
ही योजना इयत्ता ५ वी ते ७ वी आणि इयत्ता ८ वी ते १०वीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनींसाठी आहे. या योजनेअंतर्गत, अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागासवर्गीय (SBC) या समुदायातील विद्यार्थिनींना आर्थिक साहाय्य दिले जाते. या योजनेसाठी अर्ज महाडीबीटी पोर्टलद्वारे ऑनलाइन करता येतो. २०२४-२५ या शैक्षणिक सत्रातील शिष्यृवत्तीचे वाटप ३१ मार्च रोजी करण्यात आले.यंदा पहिल्यांदाच इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे सहायक संचालक डॉ. सचिन मडावी यांनी शिष्यवृत्तीचा विनाविलंब लाभ दिला. त्यामुळे गरीब, गरजू विद्यार्थिनींना दिलासा मिळाला आहे.
- पाचवी ते सातवीतील इतर मागास प्रवर्गातील मुलींना सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना
विद्यार्थिनी – २८०६
शिष्यवृत्ती – ६०९४६००
- पाचवी ते सातवीत शिकणाऱ्या विजाभज व विमाप्र मुलींना २ सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना
विद्यार्थिनी – २९३
शिष्यवृत्ती – १७५८००
- आठवी ते दहावीत शिकणाऱ्या इतर मागास प्रवर्गातील मुलींना सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना
विद्यार्थिनी – ९८९
शिष्यवृत्ती – २९६७०००
- आठवी ते दहावीतील विजाभज व विमाप्र मुलींना सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना
विद्यार्थिनी – १५६९
शिष्यवृत्ती – ३६४८०००
मॅट्रिकपूर्व सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत पात्र मुलींना लाभ दिला आहे. शिष्यवृत्तीतून या मुली शैक्षणिक साहित्य व इतर शिक्षणविषयक गरजा पूर्ण करतील. ‘डीबीटी’द्वारे थेट विद्यार्थिनींच्या खात्यात पैसे जमा केले आहेत.