Friday, August 1, 2025
spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

Related Posts

शेतकऱ्यांची लूट! जिल्हाधिकाऱ्यांची थेट कृषी सेवा केंद्रावर धडक

अकोला (Akola) :- खरीप हंगामासाठी जिल्ह्यात कृषी निविष्ठांचा पुरेसा साठा उपलब्ध ठेवण्याबरोबरच विक्री व्यवहारात पारदर्शकता ठेवण्याचे प्रशासनापुढे आव्हान आहे.बियाणे, खतांचा काळाबाजार होऊन शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात लूट होते. ती रोखण्यासाठी भरारी पथके नियुक्त केले. खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी आज शहरातील काही कृषी केंद्रांवर थेट धडक देऊन तपासणी केली.
कृषी निविष्ठांची सार्वत्रिक मुबलक उपलब्धता ठेवण्यासह कुठेही चढ्या दराने विक्री, साठेबाजी होता कामा नये, यासाठी जिल्हाधिकारी अजित कुंभार स्वत: सक्रिय झाले आहेत.

दुकानांवर निविष्ठांचे दर, उपलब्ध साठा आदी माहितीचे सुस्पष्ट फलक असणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे, वाढते ऊन पाहता सावलीची व्यवस्था, पेयजल, सीसीटीव्ही आदी सुविधा असाव्यात. शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास होता कामा नये. विक्री केंद्रांनी फलक व इतर सुविधा उपलब्ध ठेवल्या किंवा कसे, याबाबत कृषी सहायकांच्या माध्यमातून तपासणी करून सात दिवसांत अहवाल देण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.

भरारी पथकांनी सजग राहून कार्यवाही करावी. कपाशीच्या बियाण्यात जिल्ह्यात अजित सीड्स वाणाच्या मागणीनुसार साडेतीन लाख पाकिटांची उपलब्धता ठेवावी. खते, बियाणे विक्रीत इतर उत्पादन लिंकिंग करू नये. एका उत्पादनाबरोबर दुसरे उत्पादन घेण्याची बळजबरी करू नये. नियमभंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही जिल्हाधिकाऱ्यांनी दिला. शहरातील शहा एजन्सीज, पाटणी ट्रेडर्स, मिलींद एजन्सी आदी दुकानांना जिल्हाधिकाऱ्यांनी भेट देऊन तपासणी केली.खरीप हंगामात जिल्हाभरातील कृषी सेवा केंद्राची तपासणी करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Popular Articles