नियमाने काम केल्यास वाहनधारकांना सोसावा लागतो मानसिक त्रास
अमरावती (Amaravati) :- अमरावतीच्या प्रादेशिक परिवहन कार्यालयात वाहनांचे पासिंग म्हणजे वाहनधारकांसाठी डोकेदुखी ठरले आहे. रिक्षा, टेम्पो, ट्रकसारख्या व्यावसायिक वाहनांचे दरवर्षी तपासणी (पासिंग) करणे कायद्याने बंधनकारक आहे. मात्र हे काम करताना वाहनधारकांना अपॉईंटमेंट, शुल्क, तपासणी आणि पुन्हा अपॉईंटमेंट या सगळ्या टप्प्यांमध्ये अनावश्यक त्रास सहन करावा लागतो आणि या सगळ्या प्रक्रियेत दलालांची भूमिका मध्यवर्ती बनली आहे.
वाहन पासिंगसाठी आधी ऑनलाईन अपॉईंटमेंट घ्यावी लागते. ऑनलाइन अपॉइंटमेंट मिळाल्यानंतर नमूद दिवशी गाडी बडनेऱ्याजवळील मेघे कॉलेज जवळील तपासणी फाट्यावर घेऊन जावी लागते.त्याठिकाणी मोटार वाहन निरीक्षक वाहन तपासतात आणि वाहन पास करतात. मात्र दलालांकडून हे वाहन आले असेल तर अधिकारी ते पास करतात अन्यथा वाहन कितीही सुस्थितीत असले तरी (RTO) आरटीओ अधिकारी विविध कारणे सांगून तपासणी नाकारतात.
अपॉईंटमेंटनंतर गाडी तपासणीसाठी घेऊन गेल्यावर “ब्रेक कमी आहे”, “लाइट चालू नाही”, “सिग्नल बंद आहे” अशा कारणांमुळे पासिंग नाकारले जाते. पुन्हा तपासणीसाठी दुसऱ्यांदा अपॉईंटमेंट घ्यावी लागते आणि त्यासाठी वेगळे तपासणी शुल्क भरावे लागते. गाडी न पासिंग केल्यास दररोजचा दंडही भरावा लागतो तो वेगळाच.दुसरा आणि चौथा शनिवार, शासकीय सुट्ट्या यामुळे पासिंग वेळेत न झाल्यास दंडाची भीती असते. त्यामुळे वाहनधारक ८–१० दिवस आधी अपॉईंटमेंट घेतात, तरी अपॉईंटमेंट मिळवणेही अनेकदा कठीण होते अशी वाहन चालकांची तक्रार आहे.
कधी-कधी आरटीओतर्फे शिबिरात पासिंग केले जाते. तिथे देखील दलालांमार्फतच पैसे देवून पासिंग होत असल्याचा वाहन चालकांचा आरोप आहे.गाडीचे पासिंग दलालांमार्फत केल्यास काम झटपट होते. वाहनधारक थेट गेले, तर मुद्दाम त्रुटी दाखवून त्रास दिला जातो. वाहनधारक सांगतात की, आरटीओतील काही अधिकारी दलालांशी हातमिळवणी करून हे सर्व करत आहेत. ‘आरटीओ कांचन जाधव यांच्याकडे दलालामार्फत पैसे दिले, की गाडी लगेच पास होते’ असा थेट आरोपही अनेकांनी केला आहे.
शासनाने (Government) ठरवून दिलेल्या नियमाप्रमाणे अपॉइंटमेंट घेतेवेळी शुल्क भरले जाते. मात्र दलाल मध्ये ठेवून त्यांना अतिरिक्त पाचशे रुपये दिले की, वाहन न तपासता पास केले जाते. यामध्ये तपासणी वेळी अधिकारी पेक्षा दलालच पुढे असतो हे विशेष!
Amravati RTO website