नागपूर (Nagpur) :- स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका चार महिन्यांमध्ये पूर्ण करण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्य निवडणूक आयोगाने तयारी सुरू केली आहे. प्रभाग रचना, आरक्षण व मतदार याद्यांचे काम पूर्ण केल्यावर मगच पावसाचा अंदाज घेऊन निवडणुका कधी घ्यायच्या याचा निर्णय घेतला जाणार आहे. बहुधा निवडणुका पावसाळ्यानंतरच घेतल्या जातील, असे संकेत आहेत.
न्यायालयाच्या आदेशानुसार राज्यातील सर्व म्हणजे २९ महापालिका आणि ३२ जिल्हा परिषदांसह ६८७ स्थानिक (Local government elections) स्वराज्य संस्था तसेच दीड हजार ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीची प्रक्रिया राज्य निवडणूक आयोगाने गुरुवारी सुरू केली. या निवडणुकांसाठी प्रभाग रचनेचे अधिकार राज्य सरकारकडे असल्याने लवकरात लवकर प्रभाग रचना करण्याचे आदेश सरकारला दिल्याची माहिती राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी दिली. राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दोन ते पाच वर्षांपासून प्रलंबित असल्याने स्थानिक स्वराज्य संस्थांचा सर्व कारभार सध्या प्रशासकांकडे आहे.