Monsoon Update News :- देशभरातील शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांना आतुरता लागून राहिलेल्या मान्सून संदर्भात एक महत्वाची बातमी समोर आली आहे. यंदाचा मोसमी पाऊस वेळेआधीच केरळमध्ये दाखल होण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने (IMD) वर्तवला आहे. ऐरवी, सर्वसाधारणपणे जूनच्या पहिल्या आठवड्यात नैऋत्य मोसमी वारे हे केरळमध्ये दाखल होत असतात, आणि त्यानंतर ते हळूहळू देशाच्या इतर भागांमध्ये पसरतात. मात्र यंदा अपेक्षेपेक्षा लवकरच मोसमी वारे केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
दरम्यान, मान्सून 27 मे पर्यंत केरळमध्ये दाखल होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर महाराष्ट्रात साधारण 7 जूनपर्यंत मान्सून दाखल होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजानुसार पहिल्या आठवड्यात दक्षिण भारत, महाराष्ट्र, ओडिशा व ईशान्य भारतातील अनेक भागांत सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर दुसऱ्या आठवड्यात पश्चिम किनाऱ्यावर सरासरीपेक्षा जास्त पावसाची शक्यता आहे. तसेच तिसऱ्या आठवड्यात कर्नाटक ईशान्य किनारी प्रदेशात सरासरीपेक्षा जास्त पावसाची शक्यता हवामान विभागकडून वर्तविण्यात आली आहे. किंबहुना वायव्य भारत, तमिळनाडू वगळता देशातील बहुतेक भागांत सरासरीपेक्षा जास्त पावसाची शक्यता ही वर्तविण्यात आली आहे. तर त्यानंतरच्या आठवड्यात पूर्व भारत, मध्य भारत, पूर्व राजस्थान, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, महाराष्ट्र आणि कर्नाटक, केरळच्या किनारी प्रदेशात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.