रायपूर, 25 मे : छत्तीसगडच्या बेमेटारा येथील दारुगोळा कारखान्यात आज, शनिवारी भीषण स्फोट झाला. या अपघातात 10 जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती पुढे आलीय. तसेच या स्फोटात अनेक लोक जखमी झाले आहेत. या जखमींना हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले आहे. दरम्यान प्रशासनाकडून अद्याप मृतांच्या संख्येवर अधिकृत माहिती पुढे आलेली नाही.
राज्यातील बेमेटारा जिल्ह्यातील बेरला ब्लॉक अंतर्गत बोरसी गावात असलेल्या दारुगोळा(Ammunition)कारखान्यात स्फोट झाला. या स्फोटाचा आवाज आजुबाजुच्या अनेक गावांपर्यंत ऐकायला आला होता. या घटनेची माहिती मिळातच आजूबाजूच्या गावातील नागरिकांनी घटनास्थळी(at the scene) मोठी गर्दी केली आहे. या स्फोटाच्या 3 तासानंतरही रेस्क्यू टीम घटनास्थळी पोहचली नव्हती. जखमींपैकी 7 जणांना रायपूरच्या मेकाहारा हॉस्पिटलमध्ये आणण्यात आले आहे. पैकी एकाचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले आहे. तसेच इतर जखमींना वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. या स्फोटानंतर अनेक लोक ढिगाऱ्याखाली दबले गेले आहेत. या लोकांना बाहेर काढण्याचे काम सुरु करण्यात आल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.