कोल्हापूर : शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार जिल्ह्यामध्ये जिल्हा शीघ्र प्रतिसाद पथकाची स्थापना करण्यात आली आहे. या पथकाद्वारे जिल्ह्यामध्ये साथ उद्रेक प्रतिबंधात्मक उपायोजना व त्याच्या अन्वेषणासाठी शीघ्र प्रतिसाद देण्यात येत आहे.
एकात्मिक रोग सर्वेक्षण प्रकल्प कोल्हापूर अंतर्गत शिघ्र प्रतिसाद पथक सदस्यांची निवड करण्यात आली आहे. यामध्ये जिल्हा रुग्णालयातील फिजिशियन, मायक्रोबायोलॉजिस्ट, बालरोग तज्ञ, जिल्हा पशु वैद्यकीय अधिकारी, फूड अँड सेफ्टी ऑफिसर, जिल्हा हिवताप अधिकारी, कीटकशास्त्रज्ञ, जिल्हा साथ रोग अधिकारी व जिल्हा आरोग्य प्रयोगशाळेकडील प्रतिनिधी यांचा समावेश आहे. पथकाद्वारे जिल्ह्यामध्ये साथ उद्रेक होणाऱ्या ठिकाणी जाऊन भेटी देऊन साथ उद्रेकाचे अन्वेषण करुन त्याची निरीक्षणे आयडीएसपी (IDSP)पोर्टल वरील आयएचआयपी प्रणालीवर नोंदवण्यात येणार आहेत. तसेच उद्रेकादरम्यानच्या आजाराची व्याप्ती, त्याची कारण मीमासा व करावयाच्या प्रतिबंधात्मक उपाय योजना सुचवण्यात येणार आहेत. याबाबत डॉक्टर अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी संजय रणवीर यांनी जिल्हा शीघ्र प्रतिसाद पथकास मार्गदर्शन केले व शासनाने दिलेल्या सूचनांची जिल्ह्यामध्ये अंमलबजावणी होण्यासाठी मार्गदर्शन केले.
जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. लुद्रिक यांनी जिल्ह्यातील रेबीज नियंत्रण कार्यक्रमाचा आढावा तसेच लम्पी आजाराबाबत प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत असल्यामुळे जिल्ह्यातील लम्पी आजार नियंत्रणात असल्याचे सांगितले. डॉ परितेकर मेडिसिन डिर्पामेंट, मेडिकल कॉलेज कोल्हापूर यांनी जिल्ह्यातील साथ रोगाचा आढावा घेतला असता साथीच्या मुळाशी जावून जलजन्य व कीटकजन्य रोगावर अटकावा आणता येऊ शकतो तसेच श्वानांची वाढती संख्या हा चिंतेचा विषय असल्याचे नमूद केले.
जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. विनोद मोरे यांनी कीटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम कोल्हापूर जिल्ह्यामध्ये प्रभावीपणे राबविण्यात येत आहे प्रतिबंधात्मक कारवाई सुरु आहे. याप्रमाणे जिल्हा शिघ्र प्रतिसाद पथक कार्यान्वित असून हे पथक जिल्ह्यातील साथ उद्रेक अन्वेषण व त्याकरिता प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी फायदेशीर ठरणार असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजेश गायकवाड यांनी दिली आहे.