नागपूर (Nagpur) :- भारतीय पंचागांनुसार आणि मराठी महिन्यानुसार आषाढ हा चौथा महिना आहे. सूर्य ज्यावेळी कर्क राशीत प्रवेश करतो त्यावेळी हिंदू पंचांगातील आषाढ हा महिना सुरु होतो. या महिन्याला पावसाची देखील खास साथ असते. यंदा आषाढ महिना शनिवार, ६ जुलै २०२४ ला सुरु होणार असून तो रविवार, ४ ऑगस्ट रोजी संपत आहे.
आषाढ महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेच्या दरम्यान पूर्वाषाढ आणि उत्तराषाढ येते म्हणून याला ‘आषाढ’ (Ashadh) असे नाव पडले असे सांगितले जाते. या महिन्याला शूचि असे देखील म्हटले जाते. ऋतूमानानुसार प्रत्येक महिन्यात सण-उत्सव साजरे केले जातात. धार्मिक पद्धती सांगितल्या जातात. प्रत्येक मराठी महिन्याचे अनन्यसाधारण असे महत्व आहे, तसेच आषाढ महिन्याला देखील आहे
आषाढ महिना हा अनेक गोष्टींसाठी शुभ मानला जातो. कारण या काळात अनेक मराठी सण येतात. या काळात देवशयनी आषाढी एकादशी येते. वारकऱ्यांसाठी अत्यंत पवित्र असा काळ असतो. मस्त रिमझिम पावसात या काळात वारी निघालेली असते. त्यामुळे वारकऱ्यांसाठी असलेला सगळ्यात महत्वाचा सण आणि उपवास हा याकाळात असतो.
आषाढ महिन्यात भगवान जगन्नाथाची रथायात्रा निघते. मोठी एकादशी म्हणजे देवशयनी एकादशीही याच महिन्यात असते. त्यामुळे आषाढी वारीमुळं हा महिना महाराष्ट्रात विशेष महत्वाचा ठरतो. त्यानंतर चातुर्मास सुरू होतो आणि चार महिन्यासाठी भगवान विष्णू योग निद्रेला जातात, अशी श्रद्धा आहे. आषाढ महिन्यात सूर्यदेवाची आणि भगवान शंकराची उपासना केली जाते. तसेच, भगवान विष्णूची वामन रूपात पूजा केली जाते.
आषाढ महिन्याच्या पहिल्याच दिवशी आकाशामध्ये हत्तीच्या आकाराचा काळ्या रंगाचा पाण्याने भरलेला पावसाळी मेघ बघून कवी कालिदासांना मेघदूत हे नितांत सुंदर काव्य सुचले. एका शापित यक्षाच्या पत्नी विरहाची कल्पना मध्यभागी ठेवून त्या हत्तीसारख्या दिसणाऱ्या कृष्णमेघाला नागपूर जवळच्या रामटेक पासून हिमालयातल्या यक्षपुरी पर्यंतचा प्रवास आपल्या कल्पनेने करायला लावून आपले मनोगत अलकापुरीत रहाणाऱ्या आपल्या पत्नीपर्यंत पोहोचवण्याचे नाजूक काम ते या मेघाला करण्याची विनंती करतात अशी या काव्याची मूळ कल्पना आहे , कारण तो यक्षरूपी नायक रामगिरी पर्वतावर रहात असतो
चला तर बघूया आषाढ महिन्याचे विशेष दिवस
5 जुलै 2024 – ज्येष्ठ अमावस्या 6 जुलै 2024 – आषाढ मासारंभ
8 जुलै 2024 – मुस्लिम नूतन वर्षारंभ
9 जुलै 2024 – विनायक चतुर्थी (अंगारक योग)
14 जुलै 2024 – दुर्गाष्टमी
17 जुलै 2024 – देवशयनी आषाढी एकादशी, मोहरम
19 जुलै 2024 – प्रदोष व्रत
20 जुलै 2024 – पौर्णिमा प्रारंभ, साईबाबा उत्सव प्रारंभ
21 जुलै 2024 – गुरुपौर्णिमा
22 जुलै 2024 – साईबाबा उत्सव समाप्ती शिर्डी
23 जुलै 2024 – लोकमान्य बाळ गंगाधर टिळक जयंती
24 जुलै 2024 – संकष्ट चतुर्थी
31 जुलै 2024 – कामिका एकादशी
आता बघुयात विनायक चतुर्थी व गुरुपौर्णिमेच महत्व
9 जुलै 2024 – विनायक चतुर्थी
हिंदू धर्मात गणपतीला प्रथम पूजनीय देवाचा दर्जा आहे. कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात ही गणेश पूजनानेच होते. गणपतीला संकष्टी आणि विनायक चतुर्थी तिथी समर्पित आहे. चतुर्थीला श्रीगणेशाचे विधीवत पूजन करता व्रत करण्याची परंपरा आहे
21 जुलै 2024 – गुरुपौर्णिमा
हिंदू संस्कृतीत गुरूला नेहमीच उच्च स्थान देण्यात आले आहे. लोक गुरूला देवासारखे पूजनीय मानतात. गुरु पौर्णिमा किंवा व्यास पौर्णिमा ही आपल्या गुरूंप्रती आदर आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी साजरी केली जाते. गुरु हा एक संस्कृत शब्द आहे, ज्याचा शाब्दिक अर्थ असा आहे की जो आपले अज्ञान दूर करतो आणि आपल्याला ज्ञानाच्या प्रकाशाने प्रकाशित करतो. आषाढ महिन्यातील पौर्णिमा हा हिंदू धर्मातील वर्षातील सर्वात शुभ दिवसांपैकी एक आहे.
गुरुपौर्णिमा ही एक परंपरा आहे जी सर्व आध्यात्मिक आणि शैक्षणिक गुरूंना समर्पित आहे. हे गुरू उत्क्रांत किंवा प्रबुद्ध मानव मानले जातात जे कर्मयोगावर आधारित त्यांचे ज्ञान शिष्यांना देतात. गुरुपौर्णिमेचा सण भारत, नेपाळ आणि भूतानमध्ये हिंदू, जैन आणि बौद्ध धर्मीयांद्वारे साजरा केला जातो. गुरुपौर्णिमा ही पारंपारिकपणे एखाद्याच्या निवडलेल्या आध्यात्मिक शिक्षकांचा किंवा नेत्यांचा सन्मान करण्यासाठी साजरी केली जाते.