महाराष्ट्र (Maharashtra) :- महाराष्ट्र 1990 बॅचचे आयपीएस अधिकारी संजय कुमार वर्मा यांची मंगळवारी महाराष्ट्राचे नवे पोलिस महासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली. एका अधिकाऱ्याने ही माहिती दिली आहे. संजय वर्मा हे विधी आणि तांत्रिक महासंचालक म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी माजी डीजीपी रश्मी शुक्ला यांची जागा घेतली आहे. विरोधी पक्षांच्या तक्रारीनंतर निवडणूक आयोगाने रश्मी शुक्ला यांना राज्य पोलीस प्रमुख पदावरून हटवण्याचे आदेश दिले होते. संजय कुमार वर्मा एप्रिल 2028 मध्ये निवृत्त होणार असल्याची माहिती अधिकाऱ्याने दिली आहे.
निवडणूक आयोगाने सोमवारी मोठा निर्णय घेतला होता. काँग्रेसच्या तक्रारीवर कारवाई करत निवडणूक आयोगाने डीजीपी रश्मी शुक्ला यांना हटवले होते. वास्तविक, काँग्रेससह इतर अनेक राजकीय पक्षांनी डीजीपी रश्मी शुक्ला यांच्याबद्दल तक्रार केली होती. यानंतर निवडणूक आयोगाने कारवाई करत रश्मी शुक्ला यांची महाराष्ट्राच्या डीजीपी पदावरून बदली केली.
यासोबतच निवडणूक आयोगाने मुख्य सचिवांना संवर्गातील पुढील वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्याकडे पदभार सोपवण्याचे निर्देश दिले होते. महाराष्ट्राचे डीजीपी (Sanjay Verma) म्हणून नियुक्तीसाठी उद्या दुपारी १ वाजेपर्यंत तीन आयपीएस अधिकाऱ्यांचे पॅनेल पाठवण्याचे निर्देशही मुख्य सचिवांना देण्यात आले.
मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी याआधी अधिकाऱ्यांना आढावा बैठका आणि विधानसभा निवडणुकीच्या घोषणेदरम्यान निःपक्षपातीपणे आणि योग्य वागण्याचा इशारा दिला होता. मुख्य निवडणूक आयुक्तांनी आपले कर्तव्य बजावताना नि:पक्षपातीपणे वागले पाहिजे, असे म्हटले होते.