पाकिस्तानला (Pakistan) लागून असलेल्या राज्यांमध्ये गुरुवारी सायंकाळी मॉक ड्रिल केलं जाणार आहे. जम्मू-काश्मीर, पंजाब, राजस्थान व गुजरात या चार राज्यांमध्ये हे मॉक ड्रिल केलं जाईल. या दरम्यान, लोकांनी सतर्क राहावं अशा इशारा संरक्षण दलाने दिला आहे. केंद्र सरकारने भारतीय लष्कराला या चार राज्यांमध्ये मॉक ड्रिल करण्याचा आदेश दिला आहे. त्यानुसार पाकिस्तानच्या सीमेला लागून असलेल्या राज्यांमध्ये मॉक ड्रिल केलं जाणार आहे.
भारत पाकिस्तानबरोबर ३,३०० किलोमीटरची सीमा शेअर करतो. जम्मू काश्मीरमधील उभय देशांमधील सीमा रेषेला नियंत्रण रेषा म्हणजेच एलओसी म्हटलं जातं. तर पंजाब, राजस्थान व गुजरातमधील उभय देशांमधील सीमेला आंतरराष्ट्रीय सीमा (IB) म्हटलं जातं.
पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांनी पहलगाममध्ये केलेल्या हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाला तोंड फुटलं होतं. तेव्हा देखील भारत सरकारने देशभर मॉक ड्रिल (Mock Drill) घेतले होते. ७ मे रोजी देशातील २४४ जिल्ह्यांमध्ये मॉक ड्रिल करण्यात आलं होतं. मात्र, ६ व ७ मे च्या रात्री भारतीय वायूदलाने पाकिस्तानमधील दहशतवादी तळांवर हवाई हल्ला केला होता. या हल्ल्यात १०० हून अधिक दहशतवादी ठार झाल्याचं भारतीय लष्कराने म्हटलं होतं. मात्र भारताच्या सीमेपासून जवळ पाकिस्तानी भूमीवर १२ दहशतवादी तळ अजूनही चालू आहेत. हे दहशतवादी तळ सध्या भारतीय लष्कराच्या रडारवर आहेत. यासाठी भारतीय लष्कर मोहीम राबवत आहे.