मुंबई (Mumbai) :- ऑपरेशन सिंदूरद्वारे पाकव्याप्त काश्मीर आणि पाकिस्तानमधील दहशतवादी तळांवर भारताने हल्ला केल्यानंतर पाकिस्तान चवताळला असून दोन दिवसांपासून पाकने भारतावर हल्ला सुरू केला आहे. मात्र भारताने पाकचे सर्व प्रयत्न हाणून पाडले असून भारताने पाकिस्तानच्या प्रमुख शहरांवर तीव्र हल्ला केला. इस्लामाबाद ते कराची, लाहोरपर्यंत भारताने हल्ला केल्याने पाकची अवस्था पळता भुई थोडी अशी झाली आहे. पाकच्या कुरापती कायम असून पाकिस्तानविरुद्धचं युद्ध सुरू झाल्याने भारतानेही महत्वाचा निर्णय घेत देशभरात अलर्ट जारी केला आहे.
भारताने सीमावर्ती भागात ब्लॅकआऊट केला आहे.पंजाब, अंबाला, राजस्थान आणि हरियाणातील गावांना ब्लॅक आऊट करण्यात आला.देशभरातील महत्वाच्या आणि संवेदनशील ठिकाणांच्या सुरक्षिततेमध्ये वाढ करण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबईच्या किनारपट्टी भागाच्या सुरक्षेत तसेच गस्तीत वाढ करण्यात आली आहे. संवेदनशील भागांमध्ये सीसीटीव्ही, ड्रोनद्वारे लक्ष ठेवण्यात येत आहे.
भारत व पाकिस्तानातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील किनारपट्टी परिसरात सुरक्षेच्या दृष्टीने पावले उचलली जात आहेत. त्या अंतर्गत मुंबई पोलिसांनी भारतीय तटरक्षक दलाच्या समन्वयाने समुद्रकिनारे, बंदरे, गोदी आणि समुद्रमार्ग यांसह सर्व किनारपट्टी भागांमध्ये गस्त वाढवली आहे. तसेच संवेदनशील भागांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे आणि ड्रोनच्या माध्यमातून सर्वत्र लक्ष ठेवण्यात येत आहे.