राज्याच्या मुख्यमंत्रीपदी सोरेन तिसऱ्यांदा झाले विराजमान
रांची 04 जुलै :- झारखंड मुक्ती मोर्चाचे (झामुमो) प्रमुख हेमंत सोरेन यांनी आज, गुरुवारी संध्याकाळी 5 वाजता राज्याचे 13 वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. राज्याचे मुख्यमंत्रीपदाची सूत्रे तिसऱ्यांदा स्वीकारणाऱ्या सोरेन यांना राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांनी राजभवानात झालेल्या समारंभात पद व गोपनियतेची शपथ दिली.
शपथविधीवेळी हेमंत सोरेन(Hemant Soren) यांचे वडील शिबू सोरेन, त्यांची आई आणि पत्नी कल्पना सोरेन हेही राजभवनात दिसले. केवळ हेमंत सोरेन यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. मात्र, आज एकाही आमदाराने मंत्रीपदाची शपथ घेतली नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. भ्रष्टाचाराच्या प्रकरणात अटकेत असलेल्या हेमंत सोरेन यांना जामीन मिळाला. त्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री चम्पई सोरेन यांचा राजीनामा घेण्यात आला. त्यानंतर हेमंत सोरेन यांची बुधवारी विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड झाली. त्यानंतर कालच सोरेन यांनी आमदारांच्या पाठिंब्याचे पत्र राज्यपालांना सादर केले. ते 7 जुलै रोजी शपथ घेतील असे झामुमोचे ज्येष्ठ नेते सांगत होते. परंतु, चम्पई सोरेन यांची नाराजी पाहता सोरेन यांनी तडकाफडकी शपथविधी उरकून घेतल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
मनी लाँड्रिंग प्रकरणी ईडीने 31 जानेवारी 2024 रोजी हेमंत सोरेन यांना अटक केली. तत्पूर्वी सोरेन यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आणि राज्याची सूत्रे चम्पई सोरेन यांच्याकडे सोपवली. यादरम्यान हेमंत सोरेन यांना जामीन मिळाला. राज्यात 4 महिन्यांनी विधानसभा निवडणूक होणार आहे. त्यामुळे चम्पई सोरेन यांनी निवडणुकीपर्यंत मुख्यमंत्री पदावर राहण्याची इच्छा होती. परंतु, त्यांना राजीनामा देण्यास सांगण्यात आले. त्यामुळे सर्वाज जुने आणि विश्वासपात्र असलेल्या सोरेन यांनी निमूटपणे राजीनामा दिला. परंतु, त्यानंतर ते थेट आपल्या घरी निघून गेले. झारखंड मुक्ती मोर्चाचे ज्येष्ठ नेते स्टिफन मरांडी यांनी 7 जुलै रोजी शपथविधी होईल असे सुतोवाच केले होते. परंतु, चम्पई सोरेन यांची नाराजी पाहताच हेमंत सोरेन यांनी आजच शपथविधी उरकून घेतल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.