Saturday, June 21, 2025
spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

Related Posts

धीरज शर्मांचा अजित पवार गटात प्रवेश, तर सोनिया दुहानही बैठकीला उपस्थित

मुंबई : राज्यातील लोकसभा निवडणुकीचे (Lok Sabha Election 2024) पाच टप्पे पार पडले असून आता 4 जूनला लागणाऱ्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटात वेगळंच राजकारण सुरू आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातील धीरज शर्मा (Dheeraj Sharma) यांनी आज (27 मे) अजित पवार गटात प्रवेश केला, तर युवती संघटनेच्या राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया दुहानही मुंबईतील गरवारे क्लबमध्ये सुरू असलेल्या अजित पवार गटाच्या पक्ष कार्यकारिणी बैठकीला उपस्थित आहेत. त्यामुळे त्याही अजित पवार गटात प्रवेश करणार असल्याचे आता निश्चित झाले आहे. (Dheeraj Sharma and Sonia Duhan join Ajit Pawar group)

धीरज शर्मा यांनी शनिवारी फेसबुवक पोस्ट करत आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. त्यांनी आपल्या फेसबूक पोस्टमध्ये म्हटले की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाकडून देण्यात आलेल्या सर्व पदांचा राजीनामा देत आहे. यावेळी त्यांनी शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांनाही आपल्या पोस्टमध्ये टॅग केलं होते. याशिवाय सोनिया दुहानही शरद पवार यांची साथ सोडण्याची शक्यता वर्तविण्यात आली होती.

सोनिया दुहान या शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे राष्ट्रीय पातळीवर नेतृत्व करत आहेत. 2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर अजित पवारांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत जात उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांना खासगी विमानातून दिल्लीतील हॉटेलमध्ये ठेवण्यात आले होते. या आमदारांना हॉटेलमधून बाहेर काढण्याची जबाबदारी शरद पवार यांनी सोनिया दुहान यांच्यावर सोपविली होती. सोनिया दुहान यांनी मोठ्या शिफाफीने आमदारांना बाहेर काढून मुंबईला आणलं होतं. त्यामुळे त्या चर्चेत आल्या होत्या. मात्र आता धीरज शर्मांसह सोनिया दुहान याही अजित पवार गटाच्या मार्गावर आहेत.

मुंबईतील गरवारे क्लबमध्ये अजित पवार गटाच्या पक्ष कार्यकारिणी बैठकीत धीरज शर्मा यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. विशेष म्हणजे या बैठकीला सोनिया दुहान यांनीही हजेरी लावली आहे. धीरज शर्मा यांच्या राजीनाम्यानंतर सोनिया दुहान यांनी अद्याप कुठलीही भूमिका स्पष्ट केलेली नाही. मात्र त्यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून प्रोफाईल फोटो बदलून पक्षातून बाहेर पडण्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे आता सोनिया दुहानही अजित पवार गटात प्रवेश करतील अशी शक्यता वर्तविली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Popular Articles