मुंबई (Mumbai) :-
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांच्यासमवेत जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर, मुंबई येथे होणार्या ‘वेव्ह्स समिट 2025’च्या पार्श्वभूमीवर विविध ऑडिटोरिअम्सची पाहणी केली व पूर्वतयारीचा आढावा घेतला. त्यानंतर, पत्रकार परिषद घेऊन राज्यातील रेल्वे विकासासंदर्भात माहिती दिली. तसेच, पत्रकारांच्या विविध प्रश्नांना उत्तरेही दिली. यावेळी, महाराष्ट्रात गडकिल्ल्यांना व ऐतिहासिक ठिकाणांना जोडणारी रेल्वेची (Railway) आयकॉनिक टूर सुरू करण्यात येत असल्याची घोषणा देखील त्यांनी केली. छत्रपती शिवाजी महाराज सर्किट या नावाने ही टूर सुरू होईल, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, मी रेल्वेमंत्र्यांचे आभार मानतो, कारण रेल्वे विभागाकूडन महाराष्ट्रातील (Maharashatra ) गोंदिया बल्लारशाह मार्गाचे दुहेरीकरण करण्यात येत आहे. छत्तीसगड आणि तेलंगाणासोबतचा व्यापार आहे, त्यासाठी निश्चितच महाराष्ट्राला फायदा होईल. रेल्वे विभाग महाराष्ट्रात जवळपास 1 लाख 73 हजार कोटी रुपये खर्च करत आहे. केंद्र सरकार महाराष्ट्रातील 132 रेल्वे स्टेशन रिडेव्हलपमेंटसाठी घेतले आहेत. महाराष्ट्रातील जवळजवळ सर्वात महत्त्वाच्या रेल्वे स्टेशनचा विकास होत आहे. यावर्षी, रेल्वे बजेटमध्ये 24 हजार कोटी रुपये महाराष्ट्राला मिळाले आहेत. दरवर्षी 23 ते 25 हजार कोटी रुपये मोदी सरकारच्या काळात आपल्याला मिळत आहेत. नव्या रेल्वे लाईन सुरू आहेत,
त्यातच एक आनंदाची गोष्ट म्हणजे केंद्र सरकारच्या माध्यमातून लवकरच छत्रपती शिवाजी महाराज सर्किट सुरू होणार आहे. त्यामध्ये, अतिशय सुंदर अशी आयकॉनिक रेल्वे टूर असणार आहे. त्यामध्ये, शिवाजी महाराजांचे गडकिल्ले किंवा ऐतिहासिक ठिकाणं आहेत, सांस्कृतिक स्थळं आहेत, त्यांना जोडण्याचं काम रेल्वे विभागाकडून होणार आहे. ही आयकॉनिक रेल्वे टूर 10 दिवसांची असणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. कोकण रेल्वेसंदर्भात केंद्राला विनंती केली आहे. रेल्वेने त्यांना सामावून घ्यावं आणि केंद्राने गुंतवणूक करावी. रेल्वेच्या लाइनचे डबलिंग करणं, नवीन स्टेशन तयार करणे यासाठीचे पैसे कॉर्पोरेशनकडे नाहीत. त्यामुळे, रेल्वेने त्याचा विकास करावा, अशी विनंती आम्ही केलीय, रेल्वेकडूनही त्यास प्रतिसाद देण्यात आला आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.