Friday, August 8, 2025
spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

Related Posts

‘या’ ठिकाणी फिडर सेवा लवकरच सुरु होणार

एआयडीने दिला ठराविक मार्गांसाठी प्रस्‍ताव

नागपूर (Nagpur)20 जून:- शहराच्या विविध भागांतून मिहानला ये-जा करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी त्रासदायक ठरणाऱ्या कनेक्टिव्हिटीच्या समस्येवर तोडगा काढण्‍यात आला असून लवकरच फीडर सेवा सुरू करण्‍यात येणार आहे. या सेवेचा मिहानमध्ये काम करणाऱ्या 50,000 हून अधिक कर्मचा-यांना लाभ होणार आहे.
असोसिएशन फॉर इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट (Association for Industrial Development) ने अधिक कर्मचाऱ्यांना भेडसावणाऱ्या कनेक्टिव्हिटी समस्यांचे निराकरण करण्यासाठी महा मेट्रोचे वरिष्ठ अधिकारी आणि विविध भागधारकांसोबत एचसीएल कॅम्पसमध्ये बुधवारी बैठक घेतली. या बैठकीत निश्चित केलेले मार्ग आणि भाडे यावर सर्क्‍युलर पद्धतीने चालणारी फीडर सेवा सुरू करण्याबाबत सर्व संघटनांमध्ये एकमत झाले.

मिहान परिसरातील कनेक्टिव्हिटीमध्ये लक्षणीय सुधारणा करण्यासाठी एआयडीद्वारे तयार करण्‍यात आलेल्‍या या प्रस्‍तावात खापरी स्टेशन ते मिहानमधील विविध कंपन्‍यांच्या कॅम्पसपर्यंत प्रवाशांसाठी अखंड फीडर सेवा सुरू करणे, परतीच्या प्रवासासाठी सोयीस्कर फर्स्ट माईल सेवा प्रदान करणे, फीडर सेवेचे कॉमन मोबिलिटी कार्ड देणे, नागपूर मेट्रो आणि इतर सार्वजनिक वाहतूक पर्यायांचा अधिकाधिक वापर करण्यास प्रोत्साहन देणे आदी मुद्द्यांचा समावेश आहे. याशिवाय, गर्दी नसलेल्‍या काळात ई-रिक्षा सेवांच्या व्यवहार्यतेवरही तसेच, महा मेट्रोच्या भाड्यावरही यावेळी चर्चा करण्‍यात आली.

एआयडीने मिहानमध्ये फीडर ई-बसच्या अंमलबजावणीबाबत नागपूर महानगरपालिकेशी चर्चा करण्याचा प्रस्ताव ठेवला असून मिहानमधील विविध संस्थांमध्ये फीडर मार्ग आणि वेळापत्रकांचे तपशीलवार 100,000 फ्लायर्स प्रिंट आणि वितरित करण्‍यात येणार आहेत. महामेट्रोच्या अधिकाऱ्यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांशी केलेल्या चर्चेनुसार, 15 दिवसांत बससेवा सुरू करण्याचे वचन देत त्यांनी पाठिंबा देण्याचे आश्वासन दिले.

महा मेट्रो एनएमसीच्या ई-बसना त्यांच्या नियत स्थानकांवर चार्जिंग सुविधा प्रदान करणार असून वाहनांची संख्या वाढवणे, मार्ग आणि शुल्काचे मानकीकरण करणे, ई-ऑटो सेवांसह विद्यमान समस्यांचे निराकरण करणार आहे.
बैठकीला मेट्रोचे वरिष्ठ उपमहाव्यवस्थापक महेश मोरोणे, असोसिएशन फॉर इंडस्ट्रियल डेव्हलपमेंटचे अध्‍यक्ष आशिष काळे, एचसीएल टेक्नॉलॉजीज लि.चे केंद्र प्रमुख शैलेश आवळे, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस लिमिटेडचे केंद्र प्रमुख अरविंद कुमार यांच्‍यासह अमित काळे, मनीष अग्रवाल, गिरधारी मंत्री, सुनील नरवारे, प्रशांत उगेमुगे, अभिषेक गाजरे, मेजर कौशल नासरे, उज्वल बांबल, बी. के. दास सरमा, विनोद तांबी, अभिजीत देशमुख, संजय गावंडे, शुभम गुप्ता, नुपूर ढोले, अंकित नायक व पंकज भोकरे यांची उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Popular Articles