आरक्षणाच्या बैठकीला विरोधकांची दांडी,
मुंबई (Mumbai):- ओबीसी आणि मराठा आरक्षणावरून राज्यात वाद पेटलेला असतानाच राज्य सरकारने आरक्षणासंदर्भात महत्त्वाची बैठक घेतली. या बैठकीत ओबीसी नेत्यांनी सगे सोयरेंचा शासन निर्णय काढू नका अशी मागणी केली आहे. जर हा शासन निर्णय काढला तर ओबीसींचं फार मोठं नुकसान होईल, अशी भूमिका ओबीसी नेत्यांनी मांडली. त्याचसोबत कुणबी प्रमाणपत्र देण्याचंही थांबवा, अशाप्रकारची मागणी काही ओबीसी नेत्यांनी केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) तसंच अजित पवार यांनी आणि सर्व मंत्र्यांनी ओबीसी नेत्यांची भूमिका ऐकून घेतली.
राज्य सरकारने बोलावलेल्या या बैठकीला विरोधी पक्षातल्या नेत्यांनी बहिष्कार टाकला होता. विरोधी पक्षाच्या या भूमिकेवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निशाणा साधला आहे. ओबीसी नेत्यांची सह्याद्री अतिथीगृहावर बैठक झाल्यानंतर फडणवीसांनी पत्रकारांशी संवाद साधला.
‘बाळासाहेब आंबेडकरांनी (Balasaheb Ambedkar) महत्त्वाची भूमिका मांडली आहे. सत्ताधारी आणि विरोधकांचे मुद्दे लेखी मागितले पाहिजे. आजची बैठक ही जातीय सलोखा राखण्यासाठी आयोजित केली होती. उपस्थितांनी ज्या काही सूचना मांडल्या आहेत, त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे योग्य निर्णय घेतील’, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.