केंद्रीय मंत्री श्री. नितीन गडकरी; महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या मुलींच्या वसतीगृहाचे भूमिपूजन
नागपूर (Nagpur) :- आपल्या भागात ज्या प्रकारचे उद्योग आज आहेत किंवा भविष्यात येणार आहेत, त्यांचा विचार करून कौशल्याधारित अभ्यासक्रम सुरू व्हायला हवेत. त्यादृष्टीने रोजगाराच्या संधी लक्षात घेऊन विद्यार्थ्यांना शिक्षण व प्रशिक्षण द्यावे, असे आवाहन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना. श्री. नितीन गडकरी यांनी आज (शनिवार, दि. ५ एप्रिल) केले.
हिंगणा येथे महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या नागपूर प्रकल्पाअंतर्गत हिंगणा परिसरातील मुलींच्या वसतीगृहाचे भूमिपूजन ना. श्री. गडकरी यांच्या हस्ते झाले. कमिन्स अभियांत्रिकी महिला महाविद्यालयात आयोजित या कार्यक्रमाला हिंगण्याचे आमदार समीर मेघे, कमिन्स इंडियाच्या व्यवस्थापकीय संचालक श्वेता आर्या, मुख्य प्रशासकीय अधिकारी आशीष अग्रवाल, कार्याध्यक्ष रवींद्र देव आदींची प्रमुख उपस्थिती होती.
ना. श्री. गडकरी (Nitin Gadkari) म्हणाले, ‘आपली संस्था मिहानच्याच शेजारी आहे. मिहानमध्ये इन्फोसिस, टेक महिंद्रा, एम्स, आयआयएम, एमआरओ मिहानमध्येच आहे. सर्व प्रकारचे उद्योग इथे आले आहेत आणि अजून मोठ्या कंपन्या येणार आहेत. त्या साऱ्यांना मनुष्यबळ लागणार आहे. त्यासाठी विद्यापीठ आणि महाविद्यालयांनी उद्योगांसोबत समन्वय साधणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने भविष्यात उपयोगाचे असणारे शिक्षण विद्यार्थ्यांना द्यावे लागणार आहे.’
समाजात भेद असताना महिलांना बरोबरीचे अधिकार नसताना महर्षी कर्वे यांनी स्त्री स्वातंत्र्यासाठी मोठे कार्य केले. आजही समाजात सामाजिक आणि आर्थिक समानता प्रस्थापित व्हावी, यासाठी अनेक संस्था कार्य करीत आहेत. त्यात पुण्यातील महर्षी कर्वे शिक्षण संस्थेचाही समावेश आहे. नागपुरातही ही संस्था उत्तम काम करत आहे, असे गौरवोद्गारही ना. श्री. गडकरी यांनी काढले.