मुंबई (Mumbai) :- युतीसाठी एकमेकांना हिरवा कंदील दाखवून दोन्ही ठाकरे बंधू परदेशात गेलेत. मात्र इथे महाराष्ट्रात उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत युती होणार असल्याची जोरदार चर्चा आहे. ठाकरे गट आणि मनसे यांच्या कार्यकर्त्यांकडून दोन्ही ठाकरेंनी एकत्रित यावं यासाठी बॅनरबाजी सुरू केली आहे. राज ठाकरे २९ एप्रिल रोजी तर ४ मे रोजी उद्धव ठाकरे हे महाराष्ट्रात परत येणार असल्याची माहिती मिळतेय. गेल्या दोन ते तीन दिवसांपूर्वी राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबत युती करण्याची तयारी दाखवली आहे.
त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी सुद्धा युतीसाठी राज ठाकरेंना काही अटीशर्ती टाकल्यात. यानंतर युतीच्या चर्चा सुरू झालेल्या असतानाच दोन्ही ठाकरे हे परदेशात गेल्याचे पाहायला मिळाले. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे परदेशात गेले असताना दोन्ही पक्षांमध्ये युती होणार असल्याच्या तुफान चर्चा होत आहेत. या चर्चांदरम्यान, शिवसेना भवनासमोर दोन्ही ठाकरेंनी एकत्र यावे यासाठी तुफान बॅनरबाजी करण्यात आली. तर वांद्र्याच्या कलानगर परिसरातील दोन्ही ठाकरेंनी एकत्र यावं अशा आशयाचे बॅनर झळकवण्यात आले.