‘या’ संघाच्या बॅटिंग कोच आणि मेंटॉरच्या भूमिकेत दिसणार
भारताचा माजी अनुभवी यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिकवर मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. टी-२० विश्वचषक (T20 World Cup) २०२४ मध्ये कॉमेंट्री करणाऱ्या दिनेश कार्तिकला टूर्नामेंट संपल्यानंतर मोठी ऑफर मिळाली आहे. दिनेश कार्तिकची आयपीएल संघ रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुकडून मार्गदर्शक आणि फलंदाजी प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने सोमवारी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर ही माहिती दिली. आयपीएल २०२४ संपल्यानंतर दिनेश कार्तिकने क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून निवृत्ती जाहीर केली होती. निवृत्तीनंतर दिनेश कार्तिकने २०२४ च्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये कॉमेंट्री करताना दिसला.
आयपीएल संघ रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने दिनेश कार्तिकची मार्गदर्शक आणि फलंदाजी प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करून मोठी जबाबदारी दिली आहे. दिनेश कार्तिक आता पुन्हा एकदा विराट कोहलीसोबत ड्रेसिंग रुम शेअर करणार आहे. मात्र, यावेळी दिनेश कार्तिकची भूमिका वेगळी असणार आहे. दिनेश कार्तिक क्रिकेटच्या मैदानावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून खेळू शकणार नसला तरी ड्रेसिंग रुममध्ये तो या संघासाठी विजयी रणनीती नक्कीच बनवेल. आयपीएल २०२४ च्या मोसमात, दिनेश कार्तिकने यष्टीरक्षक फलंदाज म्हणून १५ सामन्यात ३६.२२ च्या सरासरीने ३२६ धावा केल्या. या काळात दिनेश कार्तिकने २ अर्धशतके झळकावली होती.