नागपूर (Nagpur) :- “कॅटरिना” ला कोण ओळखत नाही. तिची एक झलक बघण्यासाठी चाहते आतुर झालेले असतात. आता तर ती एकटी नाही, तर तिच्यासोबत तिची दोन मुले देखील आहेत. मात्र, तिचे सौन्दर्य तसूभरही कमी झालेले नाही. उलट ती आणखी आकर्षक दिसत आहे. वर्धा जिल्ह्यातील बोर व्याघ्रप्रकल्पात अलीकडे तिच्या मुलांसह ती फिरते आहे आणि तिच्या चाहत्यांना देखील सहज दर्शन देत आहे. त्यामुळे बोर व्याघ्रप्रकल्पाकडे चाहत्यांचा ओढा वाढतच चालला आहे. बोर व्याघ्रप्रकल्पातील पर्यटक वाहन मालक मनोज लाखे यांच्यासह डॉ. जयंत वाघ, रवी पाटील, स्वाती पाटील, विनय लेले यांना “कॅटरिना” व तीचे बछडे दिसून आले.
वर्धा जिल्ह्यातील बोर व्याघ्रप्रकल्पात “कॅटरिना” नावाची ही वाघीण आहे. पर्यटकांसाठी ती कायमच आकर्षण राहीली आहे. “कॅटरिना” व “टी-१” वाघाच्या जोडीला दोन बछडे आहेत. अलीकडे जंगल (Bor Sanctuary) सफारीदरम्यान अनेक पर्यटकांना “कॅटरिना” दोन बछड्यांसह जंगलात फिरताना दिसून येत आहे. यामुळे पर्यटकांना “कॅटरीना”ची भुरळ पडली आहे. या अभयारण्याच्या अडेगाव प्रवेशद्वाराजवळ जंगल सफारीसाठी पर्यटकांची गर्दी होत आहे. बोर अभयारण्याचे क्षेत्रफळ १३८.१२ चौरस किलोमीटर आहे. नवीन बोर व जुना बोर अभयारण्य असे दोन विभाग आहेत. या अभयारण्याचे आकर्षण म्हणजे “कॅटरिना” वाघीण आहे. खऱ्या अर्थाने येथे “कॅटरिना” आणि “बाजीराव”ची जोडी पूर्वीपासून प्रसिद्ध होती. या जोडीने अनेक बछड्यांना जन्म दिला.