औरंगजेबाच्या कबरीच्या वादावरून नागपुरात वाद
नागपूरच्या महाल भागात आंदोलनानंतर तणाव
नागपूर : औरंगजेबाची कबर हटविण्यात यावी, या मागणीसाठी नागपुरातील शिवाजी पुतळा चौकात विश्व हिंदू परिषद व बजरंग दलातर्फे सोमवारी सकाळी आंदोलन करण्यात आले असताना औरंगजेबाच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. तसेच पोस्टर फाडण्यात आले. यामुळे महाल परिसरात दिवसभर तणावाची स्थिती होती व पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात होता. सायंकाळी दोन गटांत तणाव निर्माण झाला व पोलिसांनादेखील धक्काबुक्की करत कपडे फाडण्याचे प्रकार झाले. यादरम्यान दगडफेक झाल्याने पोलिसांनी जमावावर नियंत्रण मिळविण्यासाठी अश्रू धुराच्या सुमारे शंभर कांड्यांचा वापर केल्याचे वृत्त आहे. दोन गट एकमेकांविरुद्ध उभ्या ठाकलेल्या गटांनी काही वाहने जाळली. परिणामी तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली. रात्री उशिरापर्यंत ही परिस्थिती कायम होती.
छत्रपती शिवाजी महाराज यांची तिथीनुसार जयंती असल्याने शिवाजी पुतळा चौकात सोमवारी सकाळपासूनच गर्दी होती.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापुढे विश्व हिंदू परिषद, बजरंग दलातर्फे आंदोलन करण्यात आले. औरंगजेबाची कबर शासनाने लवकरात लवकर काढावी, या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आले. आंदोलनादरम्यान विहिंप, बजरंग दलाचे पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले होते. औरंगजेबचा प्रतिकात्मक पुतळा यावेळी जाळण्यात आला.
नागपूरसोबतच राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये सोमवारी हे आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनामुळे परिसरात दिवसभर तणावाचे वातावरण होते. आंदोलन झाल्यानंतरदेखील पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त तैनात केला होता. शिवाजी पुतळा चौक, चिटणीस पार्क चौकातदेखील पोलिस बंदोबस्त होता. सायंकाळी महालात तणाव सायंकाळच्या सुमारास महालातील चिटणीस पार्क तसेच गांधी गेट परिसरात दोन गटांमध्ये तणाव निर्माण झाला होता. काही तरुणांमध्ये वाद झाला आणि मग वेगवेगळ्या अफवा पसरत गेल्या. यामुळे मोठा जमाव परिसरात जमला. यावेळी घोषणाबाजी देखील करण्यात आली. पोलिसांववर दगडफेक करण्यात आली व धक्काबुक्की करण्यात आली. परिस्थिती लक्षात घेता चिटणीस पार्क परिसरात अतिरिक्त कुमक मागविण्यात आली होती. काही तरुण यावेळी जखमी झाले व त्यांना मेयो इस्पितळात नेण्यात आले.
नागपूरकरांनी शांतता बाळगावी : नितीन गडकरी यांचे आवाहन
नागपुरातील महाल भागात तरुणांच्या दोन गटांमध्ये झालेल्या वादानंतर तणावपूर्ण स्थिती निर्माण होणे दुर्देवी असून, नागपूरकरांनी शांतता बाळगून प्रशासनाला परिस्थिती हाताळण्यासाठी सहकार्य करावे. नागपूर हे शांतता व सौहार्दासाठी देशभरात प्रसिद्ध असलेले शहर आहे. या शहरात जात-पंथ-धर्म या विषयावरून वाद किंवा भांडणे होत नाहीत. आज जे काही घडले, त्यासंबंधी प्रशासन कार्यवाही करेलच. नागपूरच्या सर्व नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे आणि शांतता प्रस्थापित होईल यासाठी स्वतः देखील प्रयत्न करावेत, असे आवाहन गडकरी यांनी केले आहे.
अफवांवर विश्वास ठेऊ नका : मुख्यमंत्री
नागपुरातील महाल परिसरात दगडफेक आणि तणावपूर्ण स्थिती निर्माण झाल्यावर पोलिस प्रशासन परिस्थिती हाताळत आहेत. या परिस्थितीत नागरिकांनी प्रशासनाला संपूर्ण सहकार्य करावे. आपण सातत्याने पोलिस प्रशासनाशी संपर्कात असून, त्यांना नागरिकांनी सहकार्य करावे. नागपूर हे शांतताप्रिय आणि एकमेकांच्या सुखदुखा:त सहभागी होणारे शहर आहे. ही नागपूरची कायम परंपरा राहिली आहे. अशावेळी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेऊ नका आणि प्रशासनाला संपूर्ण सहकार्य करा, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.