नागपूर (Nagpur) ता. 15 :- पावसाळ्यापूर्वी तयारीच्या दृष्टीने नागपूर महापालिकेतर्फे शहरातील नाग नदी, पिवळी नदी आणि पोहरा नदी या तिनही नद्यांची सफाई करण्यात येत आहे. नदी सफाई अभियान युद्धपातळीवर सुरू असून या अभियानाअंतर्गत आतापर्यंत तिनही नद्यांच्या पात्रांची 39.04 कि.मी. पर्यंत सफाई करण्यात आली आहे व त्यातून एकूण 30 हजार 65 क्यूबिक मीटर गाळाचा उपसा करण्यात आला आहे.
नागपूर महानगरपालिकेद्वारे दरवर्षी पावसाळ्यापूर्वी नदी आणि नाल्यांची सफाई करण्यात येते. पावसाळ्यात नाग नदी, पोहरा नदी व पिवळी नदी या तिनही नद्यांमधून पाण्याचा प्रवाह सुरळीतपणे व्हावा या हेतूने व संभाव्य पुराचा धोका निर्माण होऊ नये या करिता मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या निर्देशानुसार नदी स्वच्छता अभियान सुरु करण्यात आले. अतिरिक्त आयुक्त श्रीमती वैष्णवी बी. यांच्या मार्गदर्शनात नदी सफाईचे कार्य सुरु आहे. नागपूर शहरातील नाग नदी, पिवळी नदी व पोहरा नदी या तिनही नद्यांची एकूण लांबी 49.17 किलो मीटर एवढी आहे.
नद्यांच्या पात्रात असलेला गाळाचा उपसा करून पावसाचे पाणी सुरळीतपणे वाहून जाण्यासाठी काम केले जात आहे. यामुळे पावसाळ्यात नद्यांचे पाणी वाहण्याची क्षमता वाढते व प्रवाहातील अडथळा दूर करता येते. नदी स्वच्छतेसाठी पोकलेन मशीन, टिप्पर आणि जेसीबीचा वापर केला जात आहे. शहरातील नाग नदीची लांबी 16.58 किमी, पिवळी नदीची लांबी 17.42 किमी आणि पोहरा नदीची लांबी 15.17 कि.मी. आहे.
नाग नदीच्या पात्राची अंबाझरी तलाव ते पंचशील चौक, पंचशील चौक ते अशोक चौक आणि अशोक चौक ते सेंट झेव्हिअर स्कूल ते पारडी उड्डाणपूल, पारडी उड्डाणपूल ते नाग व पिवळी नदी संगम या दरम्यान पाच टप्प्यांत एकूण 11.84 कि.मी. सफाई करण्यात आली आहे. या सफाई अभियानात 20 हजार 254 क्यूबिक मीटर गाळ काढण्यात आला.
पिवळी नदीच्या पात्राची गोरेवाडा तलाव ते नारा दहन घाट, नारा घाट ते एसटीपी वांजरा, एसटीपी वांजरा ते नाग व पिवळी नदी संगम या दरम्यान तीन टप्प्यात 14.45 कि.मी. सफाई करण्यात आली आहे. या सफाई अभियानात आतापर्यंत एकूण 4610 क्यूबिक मीटर गाळ काढण्यात आला.
पोहरा नदीची सहकार नगर घाट ते बेलतरोडी पूल, बेलतरोडी पूल ते हुडकेश्वर पिपळा फाटा पूल, पिपळा फाटा ते नरसाळा विहिरगाव या तीन टप्प्यात 12.76 कि.मी सफाई करण्यात आली आहे. या सफाई अभियानात एकूण 5201 क्यूबिक मीटर गाळ काढण्यात आला.