अहमदाबाद (Ahmedabad) :- गुजरातमधील अहमदाबाद येथे एअर इंडियाचे प्रवासी विमान कोसळले आहे. हे विमान अहमदाबादहून लंडनला जात होते. या अपघातानंतर विमानाला भीषण आग लागली. अहमदाबाद विमान अपघातात सर्व २४२ प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती AP या वृत्तसंस्थेने दिली आहे.
अहमदाबादमध्ये एअर इंडियाचे (Air India) विमान कोसळल्याने संपूर्ण परिसरात गोंधळाचे वातावरण तयार झाले आहे. विमान पूर्णपणे उद्ध्वस्त झाले असून, आकाशात धुराचे लोट दिसत आहे. प्रत्यक्षदर्शींच्या मते, विमान एका इमारतीवर आदळले, ज्यामुळे हा अपघात घडला. आता या अपघातात विमानातील सर्व प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.
लंडनला जाणारे विमान ज्या ठिकाणी हे कोसळलं त्या भागात रहिवासी वस्ती आहे. अहमदाबाद विमानतळाजवळच हे विमान कोसळलं आहे. जिथे अपघात झाला, त्याच भागात अहमदाबाद येथील शासकीय रुग्णालय आहे. त्यामुळे दुर्घटनेत जखमी झालेल्या प्रवाशांना तातडीने रुग्णालयात दाखल केलं जात आहे.
एअर इंडियाचे हे विमान अहमदाबादहून लंडनला निघाले होते. या विमानात २४२ प्रवासी आणि क्रू मेंबर्स होते. त्यापैकी १६९ भारतीय नागरिक, ५३ ब्रिटिश नागरिक, १ कॅनेडियन नागरिक आणि ७ पोर्तुगीज नागरिक होते अशी माहिती एअर इंडियाने दिली आहे. तसेच प्रवाशांमध्ये ११ लहानमुलं आणि २ नवजात बालकांचाही समावेश होता या सर्वांचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे.