नागपूर (Nagpur): आर्थिक सर्व व्यवहाराचे डिजीटाईज झाल्यामुळे कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (एआय )वापरद्वारे कर प्रशासनाचा सुधारणा होत आहे. त्यातून कर चोरीला आळा घालण्याची मोठी मदत होत आहे,असे प्रतिपादन उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी केले. तंत्रज्ञानाच्या प्रक्रियेत ब्लॉकचेन तंत्रज्ञानाद्वारे डेटाबेस यंत्रणा उभारणी जात आहे.
यातून प्रत्यक्ष कर संकलन व कर भरण्याच्या व्यवहारात पारदर्शकता येत असून भ्रष्टाचाराला आळा बसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमीमध्ये (एनएडीटी) भारतीय महसूल सेवेच्या ७६ व्या प्रशिक्षण तुकडीच्या दीक्षांत समारंभ प्रमुख अतिथी म्हणून उपराष्ट्रपती बोलत होते.
यावेळी उपराष्ट्रपतींच्या पत्नी डॉ. सुदेश धनखड राज्यपाल रमेश बैस राज्यसभेचे महासचिव प्रमोदचंद्र मोदी, केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाचे अध्यक्ष नितीन गुप्ता, प्रत्यक्ष कर विभागाच्या प्रशिक्षण महासंचालनालयाचे प्रधान महासंचालक सिमांचल दास, एनएडीटीचे महासंचालक आनंद बैरवार उपस्थित होते.
जगाचा कागदी दस्तांपासून तंत्रज्ञानाच्या युगात प्रवेश झाला आहे. या बदलांमुळे करदात्यांसाठी सुलभ व पारदर्शी व्यवस्था उभी राहीली आहे. कर भरणे अधिक सोपे झाले आहे. करदात्यांचा सरकारी यंत्रणेवर विश्वास दृढ झाला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
ही विश्वासार्हता अधिक सक्षम करण्यासाठी भारतीय महसूल सेवेत रुजू होणाऱ्या नव्या अधिकाऱ्यांनी अधिक जबाबदारीने आपले कर्तव्य पार पाडावे असे उपराष्ट्रपती धनखड यांनी सांगितले.
एनएडीटीच्या १६ महिन्यांच्या प्रशिक्षण कालावधीदरम्यान विविध क्षेत्रात सर्वोत्तम ठरलेल्या ७ प्रशिक्षणार्थ्यांना उपराष्ट्रपतींच्या
हस्ते एकूण ११ सुवर्ण पदक देऊन गौरविण्यात आले. सुनीता मीना यांनी सर्वाधिक ५ सुवर्ण पटकाविले. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाचे अध्यक्ष नितीन गुप्ता यांनी मंडळाच्या प्रगतीचा आलेख मांडला.
एनएडीटीच्या प्रशिक्षण कार्यक्रम संचालक लैना बालन यांनी ७६ व्या तुकडीच्या प्रशिक्षण कार्यक्रमाविषयी माहिती दिली. प्रशिक्षणार्थी झेबाखान मन्सुरी आणि धोनेपुडी विजयबाबू यांनी प्रशिक्षण कालावधीतील अनुभव सांगितले. संचालन प्रशिक्षणार्थी प्रिया सिंह यांनी केले.