छत्रपती संभाजीनगर : मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज तिसरा दिवस आहे..तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी रात्री उशिरा भेट घेऊन जरांगे पाटील यांच्याशी बातचीत केली..वैद्यकीय पथकाने सुद्धा त्यांच्या तपासण्या केल्या.
आपल्या मागण्या मान्य झाल्याशिवाय आपण उपोषण मागे घेणार नाही अशी भूमिका जरांगे पाटील यांनी घेतली आहे. राज्य सरकार किंवा प्रशासनाच्यावतीने तीन दिवसात संवाद झालेला नाही. मनोज जरांगे पाटील यांनी आता थेट पक्षाचे नाव घेत इशारा दिला आहे. आरक्षणाविरोधात बोलाल तर विधानसभेला पाडू अशा शब्दात जरांगे पाटलांनी इशारा दिलाय.
काँग्रेसचे नवनिर्वाचित खासदार कल्याण काळे यांनी मनोज जरांगे यांची भेट घेतली. या भेटीनंतर बोलताना मनोज जरांगे पाटील यांनी वडेट्टीवारांच्या विधानावरून इशारा दिला. खासदार काळे यांच्याकडे त्याबाबत नाराजीही व्यक्त केली. जरांगे पाटील म्हणाले की, काळे कशासाठी आले मला माहित नाही. बसले त्यांनी चर्चा केली. काँग्रेस मराठ्यांची मते घेतायत(Congress is taking the votes of Marathas)आणि निवडून आले तर आमच्या विरोधात वडेट्टीवार बोलतायत. याबाबद्दल मी काळे यांच्याकडे नाराजी व्यक्त केली.
वडेट्टीवारांबाबत नाराजी व्यक्त करताना मनोज जरांगे पाटलांनी म्हटलं की, मराठा आरक्षणाविरोधात बोललात तर वडेट्टीारांना पाडेन, काँग्रेसच्या जागा पाडायला लावेन. काँग्रेसच्या सर्व जागा मराठ्यांना पाडायला लावेन असा स्पष्ट इशाराच जरांगे पाटलांनी दिलाय.उपोषणाच्या काळातच मागण्या पूर्ण करा, नंतर नको. सरकारला आमचा रोष परवडणारा नाही. आम्हाला मरेपर्यंत आरक्षणाची अपेक्षा सरकारकडून राहील. सरकार आमच्या मागण्यांबाबत दुटप्पीपणा करत आहे. आता यांची थोडी फजिती झाली. विधानसभा निवडणुकीत जास्त फजिती होईल असा इशारा सरकारला दिला.
अजित पवारांसदर्भात विचारले असता मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं की, चांगली गोष्ट आहे. आम्हाला राजकारण करायचं नाही. आमचे लेकरं मोठे झाले पाहिजे यासाठी आम्ही जीवाची बाजी लावतोय. आम्ही दिलेल्या व्याख्येनुसार सगे सोयरे कायद्याची अंमलबजावणी करावी. आमच्या मागण्या पूर्ण कराव्या यासाठीच आम्ही जीव जाळतोय, पण दिलं नाही तर कुणालाही सोडणार नाही. मी एवढा विरोध मराठ्यांसाठी करतोय. आम्हला दुसरं काही अपेक्षीत नाही
जरांगे पाटील यांच्या भेटीबाबत बोलताना खासदार कल्याण काळे यांनी सांगितलं की, निवडून आल्यानंतर जरांगे पाटील यांची भेट घ्यावी या उद्देशाने आंतरवालीमध्ये आलो. माझ्या मतदारसंघात जरांगे पाटील यांचा आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला माझा पाठिंबा राहील. जरांगे पाटील यांच्या मागण्या शासन दरबारी मांडणार आहे. माझ्या निवडणुकीत जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा फायदा झाला. वडेट्टीवार हे जरांगे पाटील आणि आंदोलनाच्या विरोधात बोलले असतील तर ते चुकीचे आहे.