कष्ट, संघर्ष कोणालाही चुकलेला नाही. पण, अनेकांच्या जीवनात संघर्षाचा हा टप्पा इतका मोठा असतो, की पाहणाऱ्यांचंही मन हेलावतं. पण, दिवस येतात आणि जातात त्याचप्रमाणं परिस्थितीसुद्धा बदलते हे मात्र नाकारता येत नाही. याचीच प्रचिती देणारा एक सुरेख व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. बऱ्याचदा वाईट गोष्टीच दाखवल्या जातात असं म्हणत सोशल मीडियाला दुषणं लावणारी मंडळीसुद्धा हा व्हिडीओ पाहून भावूक होताना दिसत आहेत. कारण, या व्हिडीओमध्ये प्रत्येक मध्यमवर्गीय जणू स्वत:ला पाहत आहे. प्रत्येकाला आपला संघर्ष, यश आणि अर्थात आईनं मारलेली मिठी आठवत आहे.
द इन्स्टीट्यूट ऑफ चार्टर्ड अकाऊंट्स ऑफ इंडिया (ICAI) च्या वतीनं 11 जुलै 2024 रोजी CA Final आणि CA Inter Exams 2024 चा निकाल जाहीर केला. मे महिन्यात घेण्यात आलेल्या या परीक्षेमध्ये अनेकजण उत्तीर्ण झाले. पण, यामध्ये डोंबिवलीच्या योगेश ठोंबरे या तरुणाचं यश अधिक खास होतं. त्यामुळं निकाल जाहीर झाला तेव्हा त्याच्याही आनंदाला पारावार उरला नव्हता.
अनेक परीक्षार्थींची नजर ज्या निकालाकडे लागली होती, ज्या परीक्षेसाठी अनेकांनीच प्रचंड मेहनत घेत दिवसरात्र एक करून अभ्यास केला होता अशा सर्वांचं लक्ष या निकालाकडे लागलं होतं. अखेर तो क्षण आला आणि निकाल जाहीर झाला. आपण परीक्षेमध्ये उत्तीर्ण झाल्याचं कळताच योगेशनं आनंदाच्या भरात आई जिथं भाजी विक्रीसाठी बसते ते ठिकाण गाठलं आणि तिथं तिला ही आनंदाची बातमी दिली.