पवारांच्या कुटुंबातून आली मोठी अपडेट
लोकसभा निवडणुकीनंतर आता महाराष्ट्रातल्या सगळ्याच राजकीय पक्षांकडून विधानसभा निवडणुकीच्या तयारीला सुरूवात झाली आहे. चार महिन्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत, त्याआधी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधून मोठी बातमी समोर आली आहे.शरद पवारांचे नातू आणि राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारांनी पुढच्या मुख्यमंत्र्यांबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. आज मुख्यमंत्री कोण होणार, हे सांगू शकत नाही पण एखादी महिला मुख्यमंत्री होऊ शकते, असं रोहित पवार म्हणाले आहेत.
दुसरीकडे अजित पवारां (Ajit Pawar) सोबत असलेल्या आमदारांबाबतही रोहित पवारांनी गौप्यस्फोट केले आहेत. त्यांचे 18 आमदार आमच्या संपर्कात आहेत, त्यांच्या पक्षातील लोक अस्वस्थ आहेत. त्यांच्यासोबत असलेले आमदार ब्रम्हदेव आला तरी त्यांच्यासोबत राहणार नाहीत, त्यामुळेच त्यांनी सुनेत्रा काकींना राज्यसभेची उमेदवारी दिली, असा दावा रोहित पवारांनी केला आहे.
‘माझ्या काकी म्हणून त्यांचे अभिनंदन करतो, त्या खासदार झाल्या आहेत. अजित पवारांनी आधी सांगितलं की राज्यमंत्रीपद आम्हाला शोभणार नाही, काकींना राज्यमंत्रीपद दिलं तर अजित पवारांना स्पष्टीकरण द्यावं लागेल. त्यांच्या पक्षात काय सुरू आहे, हे अजित पवारांना माहिती आहे, म्हणून त्यांनी काकींना खासदारकी दिली’, असं रोहित पवार म्हणाले.
‘अजित पवारांकडे जे नेते गेले आहेत त्यांना विकासासाठी पैसे पाहिजे होते. कारवाईच्या भीतीने ते तिकडे गेले आहेत. मुलगा किंवा बायको सोडून जाणार नाही याची खात्री दादांना असावी म्हणून त्यांनी घरात उमेदवारी दिली’, असं वक्तव्य रोहित पवारांनी केलं.
तसंच आपल्यात आणि जयंत पाटील यांच्यात कोणताही वाद नसल्याचं स्पष्टीकरणही रोहित पवारांनी दिलं आहे. जयंत पाटील आणि माझ्यात वाद कुठे आहे? मीडियाने वेगळा अर्थ काढला. जयंत पाटील सीनियर आहेत त्यामुळे चांगलं काम करू शकतात. कुठलं पद कुणाला द्यायचं हे साहेब ठरवतील, असं रोहित पवार म्हणाले. तसंच पक्षात कुणाला घ्यायचं, कुणाला नाही हे साहेब ठरवतील. आम्ही फक्त विनंती करू शकतो. परत घेताना कुठल्याही कार्यकर्त्यावर अन्याय झाला नाही पाहिजे, असं विधान रोहित पवारांनी केलं.