चक्रीवादळामुळे दगडाच्या खाणीमध्ये झाला अपघात
आयझवाद : रेमल चक्रीवादळामुळे मिझोराममध्ये आज, मंगळवारी भूस्खलनाची घटना घडली. एका दगडाच्या खाणीत झालेल्या या अपघातात आतापर्यंत 10 जणांचा मृत्यू झालाय. याठिकाणी अनेक मजूर या ढिगाऱ्याखाली अडकलेले असून मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जातेय.यासंदर्भातील माहितीनुसार मिझोरामची राजधानी आयझोलमध्ये हा अपघात झाला आहे. रेमल चक्रीवादळामुळे आधीच या भागात प्रचंड नुकसान झाले होते.
यातच मंगळवारी सकाळी 6 वाजेच्या सुमारास मेल्थम आणि हिमेनच्या सीमेवर एका दगडाच्या खाणीत भूस्खलन झाल्याचे वृत्त आले. यामध्ये आजुबाजुला असलेल्या अनेक घरांना नुकसान झाले आहे. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या मजुरांना बाहेर काढण्यासाठी प्रशासनाने शोध मोहिम हाती घेतली आहे. आतापर्यंत 10 मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. यापैकी 6 मजूर हे बाहेरील राज्यातील आहेत. मृतांची ओळख पटविण्याचे काम बाकी आहे. तर वाचविण्यात आलेला एक व्यक्ती मिझोरामचा रहिवासी आहे. दरम्यान राज्यात यापूर्वी नोव्हेंबर 2022 मध्येही अशीच दुर्घटना घडली होती. त्यावेळी 12 जणांचा मृत्यू झाला होता.