पीडीपी कार्यकर्त्यांच्या अटकेचा नोंदवला निषेध
श्रीनगर, 25 मे : लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यात जम्मू-काश्मीरमधील अनंतनाग-राजौरी लोकसभा मतदारसंघातही आज, शनिवारी मतदान होत आहे. दरम्यान, पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टीच्या (पीडीपी) अध्यक्ष मेहबूबा मुफ्ती यांनी बिजबेहरामध्ये धरणे दिले. पीडीपी कार्यकर्त्यांच्या आणि पोलिंग एजंटच्या अटकेविरोधात त्यांनी हे आंदोलन केले. मेहबुबा या अनंतनाग-राजौरी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. या मतदारसंघात 20 उमेदवार रिंगणात आहेत.
अनंतनाग आणि दक्षिण काश्मीरमधील इतर जिल्ह्यांमध्ये शुक्रवारी रात्री कोणतेही कारण नसताना त्यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना पोलिंग एजंटना आणि अटक करण्यात आल्याचा आरोप पीडीपी अध्यक्षांनी केला. त्यांनी सांगितले की, पीडीपी कार्यकर्त्यांच्या अटकेचे कारण कळू शकलेले नाही. असे दिसते की लेफ्टनंट गव्हर्नर, पोलिस महासंचालक आणि दक्षिण काश्मीरचे पोलिस उपमहानिरीक्षक यांचे एकमेकांशी संगनमत आहे. मेहबुबा मुफ्ती संसदेत पोहोचण्याची त्यांना इतकी भीती वाटत असेल, तर उपराज्यपालांनी मला निवडणूक न लढवायला सांगायला हवे होते.
‘ते 1987 ची पुनरावृत्ती का करत आहेत ? त्यांचे नेते आणि माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी मतदान प्रक्रियेतून जम्मू-काश्मीरच्या जनतेला दिलेले आश्वासन… हे लोक सर्वांचे नुकसान करत आहेत आणि 1987 ची पुनरावृत्ती करत असल्याचा आरोप मुफ्ती यांनी केला. आमच्या निरपराध पोलिंग एजंट आणि कार्यकर्त्यांना दक्षिण काश्मीरच्या पोलिस ठाण्यांमध्ये कोणतेही कारण नसताना ताब्यात घेण्यात आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी अद्याप कोणतेही निवेदन दिलेले नसल्याचे मुफ्ती म्हणाल्या. ‘अनेक मतदान केंद्रांवर मुद्दाम ईव्हीएम खराब केल्याच्या बातम्या येत आहेत. ‘जर त्यांना 1987 च्या निवडणुकीतील हेराफेरीची पुनरावृत्ती करायची असेल तर इथे मतदान घेण्याचे नाटक का केले जात आहे, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. निवडणुकीत मोठ्या प्रमाणात हेराफेरी होत असून लोकांना त्रास दिला जात आहे, धमक्या दिल्या जात आहेत असा आरोप त्यांनी केला. यावेळी मेहबूबा यांनी आरोप केला की, कुठलेही कारण न सांगता त्यांच्या मोबाईचे आउटगोइंग बंद करण्यात आली आहे. त्यामुळे सकाळपासून मला एकही फोन येत नसून अनंतनाग लोकसभा मतदारसंघात मतदानाच्या दिवशी अचानक सेवा निलंबित करण्याबाबत कोणतेही स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही.
जम्मू-काश्मिरात 1987 च्या विधानसभा निवडणुकीत हेराफेरीचे आरोप झाले होते. निवडणूक निकाल जाहीर होण्यास एक आठवडा उशीर झाला. मतपत्रिकेत फेरफार करून मोहिउद्दीन शाह यांना विजयी केल्याचा आरोप करण्यात आला. यापूर्वी ते पराभूत झाले होते. पण, नंतर त्यांना विजयी घोषित करण्यात आले. जम्मू-काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेस एकत्र निवडणूक लढवत होते. मतदानातील अनियमिततेवरून सलाहुद्दीन आणि मुस्लिम युनायटेड फ्रंटच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली होती. या निवडणुकीनंतर जम्मू-काश्मीरमधील राजकारणाची दिशा बदलली होती.