माजलगाव पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता राजेश सलगरकर लाचलुचपत प्रतिबंधक (एसीबी) विभागाने लाच घेताना रंगेहाथ पकडले होते. त्यांच्या घराची झडती घेतली असता, ११ लाखांची रोख व सोन्याच्या दागिन्यासह अन्य मालमत्तेचे दस्तऐवज आढळून आले.
एसीबी अधिकाऱ्याने सांगितले की, कार्यकारी अभियंता सलगरकर यांनी तलावातील गाळ व माती शेतात टाकण्याच्या परवानगीसाठी २८ हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले होते. त्यानंतर त्याच्या अंबाजोगाई येथील किरायाच्या घराची पंचासमक्ष झडती घेतली. त्यांच्याकडे ११ लाख २८ हजारांची रोख, ३० ग्रॅम सोन्याचे दागिने, ३ किलो चांदीसह चार भूखंडाचे दस्तऐवज आढळून आले. सर्व मुद्देमाल जप्त केला असून, याप्रकरणी परळी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.