नागपूर (Nagpur) :- सध्या शाळा, महाविद्यालये सुरू होत आहेत. त्यामुळे पालकांची मुलांच्या तयारीसाठी खरेदीची लगबग सुरू आहे. त्यात मोसमी पाऊसही उंबरठ्यावर येऊन बसला आहे. अशा वेळी शहरातला अत्यंत वर्दळीचा मार्ग असलेल्या रिंगरोडवर पुढील दोन दिवस वाहतूकीचा खोळंबा होणार आहे. दक्षिण नागपुरातील वीज ग्राहकांना अखंडित वीजपुरवठा मिळावा यासाठी या मार्गावरील वाहतूकीत तात्पुरता बदल होणार आहे. परिणामी नागपूरकरांच्या डोक्याला ताप वाढणार आहे.
दक्षिण नागपुरात महावितरणने बेसा पॉवर हाऊस चौक ते म्हाळगी नगर चौकादरम्यानच्या रस्त्याखालील ११ केव्ही जानकीनगर भूमिगत वीजवाहिनीचे काम हाती घेतले आहे. या कामामुळे शुक्रवार, २० जून आणि शनिवार, २१ जून ला रिंगरोडजवळ खोदकाम आवश्यक झाले आहे. त्यामुळे या मार्गावरी वाहतूक व्यवस्थेत तात्पुरते बदल होतील. नागरिकांना या पर्यायी मार्गांचा अवलंब करावा लागणार आहे.
नादुरुस्त वीजवाहिनी दुरुस्तीमुळे बेसा पॉवर हाऊस चौक ते म्हाळगी नगर चौक दरम्यानचा रस्ता दुरुस्ती कामासाठी पूर्णपणे बंद असेल. या काळात वाहन कोंडी टाळण्यासाठी वाहतूक मार्गात बदल होतील.