नागपूर (Nagpur) :- केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी बुधवारी टोल टॅक्स नियमांमध्ये मोठा बदल करण्याचा घोषणा केली आहे. यामुळे सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. देशातील राष्ट्रीय महामार्गांवरून वारंवार प्रवास करणाऱ्यांसाठी ही एक आनंदाची बातमी आहे. सरकार आता खाजगी वाहनांसाठी फास्टॅग आधारित वार्षिक पास जारी करणार असल्याची माहिती गडकरींनी बुधवारी ट्विटरद्वारे दिली. या पासची किंमत 3 हजार रुपये असेल. येत्या 15 ऑगस्टपासून ही पास प्रणाली सुरू होईल. या पासमुळे खाजगी वाहन मालकांना राष्ट्रीय महामार्गांवर कमी खर्चात आणि त्रासमुक्त प्रवास करता येईल. 3000 रुपयांमध्ये FASTag पास बनवला जाईल. या पासअंतर्गत वाहन मालकांना एका वर्षात जास्तीत जास्तीत 200 वेळा टोलमधून जाता येईल.
नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी ट्विटरवर लिहिलं, ’15 ऑगस्ट 2025 पासून 3000 रुपयांचा फास्टॅग आधारित वार्षिक पास सुरू केला जात आहे. हा पास सक्रिय झाल्याच्या तारखेपासून एक वर्षासाठी किंवा 200 प्रवासांपर्यंत (जे आधी होईल ते) वैध असेल. हा पास विशेषत: गैर व्यावसायिक खाजगी वाहनांसाठी (कार, जीप, व्हॅन इ.) डिझाइन केला आहे आणि देशभरातील राष्ट्रीय महामार्गांवर अखंड प्रवास करण्यासाठी सक्षम असेल.’