नागपूर (Nagpur) :- करोनानंतर सोन्याच्या दरात मोठ्या प्रमाणात सतत वाढ झाली. त्यामुळे बघता- बघता हे दर विक्रमी उंचीवर पोहचले. २२ एप्रिल २०२५ रोजी सोन्याच्या दराने जीएसटी व मेकिंग शुल्क पकडून एक लाखाचा पट्टा ओलांडला. परंतु त्यानंतर सोन्याच्या दरात सातत्याने घट होत असल्याने ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. २२ एप्रिल २०२५ रोजीच्या तुलनेत अकरा दिवसांनी सोन्याचे दर जीएसटी व मेकिंग शुल्क वगळून तब्बल ५ हजार ६०० रुपये प्रति दहा ग्रामने घसरल्याचे दिसत आहे.
दरम्यान नागपुरातील सराफा बाजारात शनिवारी ३ मे २०२५ रोजी प्रति १० ग्राम २४ कॅरेटसाठी ९३ हजार ८०० रुपये, २२ कॅरेटसाठी ८७ हजार २०० रुपये, २२ कॅरेटसाठी ७३ हजार २०० रुपये, १४ कॅरेटसाठी ६१ हजार रुपये नोंदवले गेले. त्यामुळे नागपुरात २२ एप्रिलच्या तुलनेत ३ मे २०२५ रोजी सोन्याचे दर २४ कॅरेटसाठी प्रति दहा ग्राम ५ हजार ६०० रुपये, २२ कॅरेटसाठी ५ हजार २०० रुपये, १८ कॅरेटसाठी ४ हजार ३०० रुपये, १४ कॅरेटसाठी ३ हजार ६०० रुपये घसरले आहे. ही मोठी घसरण असून लग्नसमारंभाच्या कुटुंबियांना मोठा दिलासा मिळाला आहे.
दरम्यान यंदाच्या अक्षय तृतीयाच्या (Akshay Trutiya) मुहर्तावर सोन्याचे दर पूर्वीच्या तुलनेत कमी झाल्याने ग्राहकांकडून मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करण्यात आल्याने मागच्या वर्षीच्या तूलनेत व्यवसाय सुमारे २० ते २५ टक्यांनी वाढल्याचा सराफा व्यवसायिकांचा दावा आहे. ही वाढ वजनामध्ये मागच्या वर्षीच्या तुलनेत सारखी असली तरी सोन्याचे दर वाढल्याने वाढल्याचेही त्यांचे म्हणने आहे. दरम्यान आता सोन्याचे दर कमी असले तरी येत्या काळात ते पून्हा वाढण्याचे संकेतही सराफा व्यवसायिकांकडून दिले जात आहे. त्यामुळे आता सोन्यात गुंतवणूक फायद्याची अस्याचा त्यांचा दावा आहे.